परभणी : २ महिन्यांत ११२ जणांचा कुत्र्यांनी घेतला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:22 AM2019-12-28T00:22:26+5:302019-12-28T00:23:22+5:30
गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोकाट कुत्र्यांची चांगलीच दहशत पसरली असून पिसाळलेले कुत्रे आता थेट नागरिकांना चावायला लागली आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात मानवत शहरातील ११२ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोकाट कुत्र्यांची चांगलीच दहशत पसरली असून पिसाळलेले कुत्रे आता थेट नागरिकांना चावायला लागली आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात मानवत शहरातील ११२ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मानवत शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. ही समस्या जटील होत असल्याचे चित्र आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण होत नसल्याचे चित्र शहरभर दिसून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून पालिकेकडून या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी मोकाट कुत्र्यांच्या संख्येत भर पडली आहे. शहरातील जुने बसस्थानक, संत जगनाडे महाराज चौक, आठवडी बाजार परिसर, पाळोदीरस्ता, भाजी मंडई या परिसरासह शहरातील मांस विक्रीच्या दुकानांसमोर कुत्र्यांच्या झुंडी फिरताना दिसत आहेत. या ठिकाणाहून जेष्ठ नागरिक, लहान मुले, शालेय विद्यार्थी, महिला यांना चालणे कठीण झाले आहे. शहरातील मार्केडेय नगर, पेठ मोहल्ला, बुद्धनगर, कुºहाडे गल्ली, लाड गल्ली, आंबेडकर नगर, पॉवरलूम, नवा मोंढा, आंबेगाव नाका, बिहारी कॉलनी, खंडोबा रोड या भागासह चौका- चौकात रात्रीच्यावेळी ही भटके कुत्रे अगदी टोळीने उभे असतात. चारचाकी किंवा दुचाकी आली की तिच्या मागे कुत्रे एकामागून एक धावत सुटतात. रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांना हे कुत्रे लक्ष करतात. दुचाकीस्वरांच्या मागे ही कुत्रे लागल्याने अनेक अपघाताच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. शहरातील बहुतांश पिसळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेक वेळा नगर पालिकेकडे करण्यात आली, मात्र पालिकेकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे.
२१४ जणांवर : झाले उपचार
४मागील सहा महिन्यात ग्रामीण रुग्णालयात कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सहा महिन्यात २१४ रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारी लस महागडी असली तरी ती ग्रामीण रुग्णालयात मोफत मिळते.
४या रुग्णांना प्रत्येकी तीन प्रमाणे जून महिन्यात ६८, जुलैमध्ये १५९, आॅगस्टमध्ये ६४, सप्टेंबरमध्ये ९९, आॅक्टोबरमध्ये ९२, नोव्हेंबरमध्ये ९१ आणि २७ डिसेंबरपर्यंत ७० लसी अशा एकूण ६१४ लसी देण्यात आल्या आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या औषधी निर्माण अधिकारी शीतल गायकवाड यांनी दिली.
मोकाट जनावरांनीही मांडला उच्छांद
४शहरात मोकाट कुत्र्याप्रमाणे मोकाट जनावरांची समस्याही वाढली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील नगरपालिका, भाजी मंडई, मंत्री गल्ली, पोलीस ठाणे, पाथरी नाका, आठवडी बाजार परिसर, बसस्थानक याठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे.
४या जनावरांच्या मालकांकडून त्यांना निष्काळजीपणे व बेजबाबदारपणे सोडून दिले जाते. शहरातील आठवडी बाजार, भाजी मंडई आणि मंत्री गल्लीत जाणाºया चौकात जनावरे नेहमी ठाण मांडून बसलेली असतात. याभागात प्रवांशाची वर्दळ मोठ्याप्रमाणावर असते. फळगाडेवाल्यांनी अगोदरच आपले गाडे लावल्याने येथून वाहन काढणे अवघड होत आहे. मोकाट जनावरे बिनधास्तपणे रस्त्याने वावरत असल्याने छोट्या-मोठ्या अपघातांची संख्या वाढली आहे.
४ पालिकेने मोकाट जनावरे पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे. मागील अनेक महिन्यांपासून पालिकेने मोकाट जनावरा संदर्भात कोणतीच कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.
अलीकडच्या काळात डॉगबाईट चे प्रमाण वाढले असुन रॅबीज लस घेणे हा त्यावर प्रभावी उपचार आहे. ग्रामीण रुग्णालयात या लसी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
- डॉ.नरेंद्र वर्मा, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मानवत.