परभणी :६ तालुक्यांना दुष्काळी परिस्थितीचीगंभीर झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:17 AM2018-10-21T00:17:28+5:302018-10-21T00:18:11+5:30
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील सत्यमापन चाचणी पूर्ण झाली असून, या चाचणीचा अहवालही जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे़ प्रारंभी पाहणीमध्ये सहाही तालुक्यांना दुष्काळाची गंभीर झळ पोहचली असून, प्रत्यक्ष आकडेवारीची गोळाबेरीज केल्यानंतर या संदर्भातील अंतीम अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील सत्यमापन चाचणी पूर्ण झाली असून, या चाचणीचा अहवालही जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे़ प्रारंभी पाहणीमध्ये सहाही तालुक्यांना दुष्काळाची गंभीर झळ पोहचली असून, प्रत्यक्ष आकडेवारीची गोळाबेरीज केल्यानंतर या संदर्भातील अंतीम अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे़
परभणी जिल्ह्यात यावर्षी परतीच्या पावसाने दगा दिला़ मोसमी पाऊसही जेमतेम बरसला़ त्यामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी पूर्ण झाली नाही़ सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्हाभरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ खरिप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले आहे़ याशिवाय प्रकल्पांमध्ये पाणीसाठा नसल्याने आतापासूनच टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे आतापासूनच जिल्हावासिय दुष्काळाच्या झळा सहन करीत आहेत़ नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी़, जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत असल्याने राज्य शासनाने केंद्र शासनाच्या निकषानुसार जिल्हाभरात दुष्काळाची पाहणी सुरू केली आहे़ तीन टप्प्यांमध्ये परिस्थितीची पाहणी केली जात आहे़ पहिल्या टप्प्यात केवळ पावसाच्या सरासरीवर आधारित दुष्काळी तालुक्यांची निवड करण्यात आली़ या निकषांमध्ये पूर्णा तालुका वगळता इतर सर्व तालुके दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समाविष्ट झाले़ दुसºया टप्प्यात ठरविलेल्या निकषात जिंतूर आणि गंगाखेड हे दोन तालुके वगळण्यात आले़ जिल्ह्यात एकूण ९ तालुक्यांचा समावेश असून, तिसºया टप्प्यामध्ये यातील सहा तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली़
जिल्हा प्रशासनाने अॅपच्या सहाय्याने तिसºया टप्प्यात पाहणी केली़ या पाहणीसाठी रँडम पद्धतीने दहा टक्के गावांची निवड करण्यात आली होती़ सहा तालुक्यांमधील सुमारे ५० गावांमध्ये प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोग करण्यात आले़ सत्यमापन चाचणीत पीक उत्पादकतेबरोबरच पाण्याची परिस्थिती, रोजगाराचा प्रश्न आणि इतर बाबींचाही आढावा घेण्यात आला़ या आढाव्यातून दुष्काळाची झळ किती प्रमाणात बसली आहे, याचा अंदाज काढला जाणार आहे़ जिल्हा प्रशासनाकडे सत्यमापन चाचणीचे अहवाल प्राप्त झाले असले तरी अद्याप या अहवालांचे मूल्यमापन पूर्ण झालेले नाही; परंतु, प्राथमिक अंदाजानुसार सहाही तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाची परिस्थिती असल्याचे दिसत आहे़ त्यामुळे हे सर्व तालुके गंभीर दुष्काळाच्या यादीत मोडण्याची शक्यता आहे़ या संदर्भात सोमवारपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयास अहवाल पाठविला जाणार असून, त्यानंतरच प्रत्यक्ष दुष्काळी तालुक्यांची माहिती समोर येणार आहे़
पीक उत्पादन : महत्त्वपूर्ण घटक
सत्यमापन चाचणीमध्ये तालुक्यांतील पिकांचे उत्पादन हा महत्त्वपूर्ण घटक आहे़ यासह इतर घटकांचाही समावेश करून दुष्काळाची तीव्रता ठरविली जाणार आहे़ पीक उत्पादनानुसार ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान असेल तर त्या तालुक्यांत दुष्काळ नाही, असे गृहित धरले जाणार आहे़ ३३ ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान असणाºया तालुक्यांमध्ये मध्यमस्वरुपाचा दुष्काळ आणि ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असेल तर अशा तालुक्यांना गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असणाºया तालुक्यांच्या यादीत समाविष्ट केले जाणार आहे़
४पिकांच्या उत्पादकतेबरोबरच पिण्याचे पाणी, चाºयाची उपलब्धता आणि रोजगाराचा प्रश्न या बाबींचाही अभ्यास केला जाणार आहे़ सहा तालुक्यांमधील ५० गावांमध्ये सत्यमापन चाचणी पूर्ण झाली असून, या चाचणीच्या अहवालावरच दुष्काळासंदर्भातील राबविण्यात येणाºया उपाययोजना व निर्णय अवलंबून राहणार आहे़
या गावांमध्ये झाली सत्यमापन चाचणी
जिल्हा प्रशासनाने १० टक्के रँडम पद्धतीने सहा तालुक्यांमधील ५० गावांची निवड केली होती़ त्यात परभणी तालुक्यातील टाकळगव्हाण, इठलापूर,पोखर्णी, दैठणा, जांब, नागापूर, हसणापूर, पेडगाव, मिरखेल, देवठाणा, वाडी दमई, हिंगला, असोला आणि टाकळी कुंभकर्ण या चौदा गावांमध्ये सत्यमापन चाचणी करण्यात आली़ पालम तालुक्यात बोरगाव बु़, जोगलगाव, सिरसम, कोळवाडी, पेंडू बु़, सोमेश्वर, धनेवाडी, कांदलगाव, चाटोरी, सेलू तालुक्यात गणेशपूर, खैरी, ब्रह्मवाकडी, काजळी रोहिणा, राजुरा, कुडा, धनेगाव, शिंदे टाकळी, ढेंगळी पिंपळगाव, शिराळा़ सोनपेठ तालुक्यात सायखेड, करम, उखळी तांडा, दुधगाव, सोनखेड, थडी उक्कडगाव़ मानवत तालुक्यातील खडकवाडी, हमदापूर, मानवत, रुढी, गोगलगाव, सावरगाव आणि पाथरी तालुक्यात निवळी, बांदरवाडा, वडी, वरखेड, गौडगाव, मसला तांडा आदी गावांमध्ये सत्यमापन चाचणी करण्यात आली़
उपाययोजना राबविण्याची गरज
जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने या तालुक्यांत दुष्काळ निवारणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे़ जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ तेव्हा शहरी भागासह ग्रामीण भागातील पाण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे़ या दृष्टीने प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे़