परभणी : ६० हजार हेक्टर सिंचन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:17 AM2018-10-16T00:17:44+5:302018-10-16T00:18:39+5:30

पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर या प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने लाभक्षेत्रातील सुमारे ६० हजार हेक्टर जमिनीवरील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या शिवाय जिंतूर तालुक्यातील १३ लघू प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने पाणीप्रश्न अधिकच गंभीर होत आहे.

Parbhani: 60 thousand hectares of irrigation threat | परभणी : ६० हजार हेक्टर सिंचन धोक्यात

परभणी : ६० हजार हेक्टर सिंचन धोक्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी) : पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर या प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने लाभक्षेत्रातील सुमारे ६० हजार हेक्टर जमिनीवरील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या शिवाय जिंतूर तालुक्यातील १३ लघू प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने पाणीप्रश्न अधिकच गंभीर होत आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात येलदरी प्रकल्पामध्ये केवळ ९ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेष म्हणजे येलदरी प्रकल्पात पाच वर्षांपासून जेमतेम पाणीसाठा होत असल्याने तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प म्हणून येलदरीची ओळख आहे. या प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने अर्ध्या मराठवाडयात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागासह जिल्हा प्रशासनाला पाण्याचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यावर्षी जिंतूर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविली. दमदार पाऊस झाला नसल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. येलदरी प्रकल्पात पाणीसाठा झाला नसल्याने परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात २२५ हून अधिक गावांसह मोठ्या शहरांमध्ये टंचाई व चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
जिंतुरातील ११ लघू तलाव कोरडेच
जिंतूर तालुक्यात लघू सिंचन विभागांतर्गत १३ लघू तलाव असून एक मध्यम प्रकल्प आहे. त्यापैकी देवगाव लघू तलावात ५७ टक्के, जोगवाडा ९० टक्के, बेलखेडा ८० टक्के, वडाळी ८९ टक्के, पाडळी ५५ टक्के, चारठाणा ८३ टक्के, कवडा ५२, भोसी ८, मांडवी ८०, दहेगाव १५, केहाळ २१, आडगाव १७ आणि चिंचोली लघू तलवात केवळ १६ टक्के पाणीसाठा आहे. १३ पैकी ११ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. तर करपरा मध्यम प्रकल्पात ७६ टक्के पाणीसाठा असल्याने हे पाणी किती दिवस पुरेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरवर्षी साठ्यात घट
१९७२ च्या दुष्काळानंतर प्रथमच येलदरी धरणात एवढा कमी पाणीसाठा जमा झाला आहे. दरवर्षी पाणीसाठ्यात घट होत असल्याने पुढील वर्षी पाणीसाठा शिल्लक राहतो की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.
खडकपूर्णामुळे वाढल्या अडचणी
पूर्णा नदीवर येलदरी धरणाच्या वर बुलढाणा जिल्ह्यात खडकपूर्णा धरण बांधण्यात आले. २०१३ पासून या धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला जात आहे. त्यामुळे २०१३ नंतर येलदरी प्रकल्पात पाणीसाठा जमा झाला नाही.
परिणामी येलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या लाभक्षेत्रातील ६० हजार हेक्टर शेतजमिनीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हावासियांसाठी खडकपूर्णा धरणामुळे अडचणी वाढल्या आहेत. यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Parbhani: 60 thousand hectares of irrigation threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.