परभणी : ६२ सीसीटीव्हींचे बोरी गावावर लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:25 AM2019-03-13T00:25:38+5:302019-03-13T00:26:07+5:30
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी ग्रामस्थ, व्यापारी व ग्रामपंचायत कार्यालयाने १० लाख रुपयांचा निधी खर्च करुन ८ मार्च रोजी ६२ सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाच्या ठिकाणी बसविले आहेत. त्यामुळे या कॅमेऱ्याद्वारे बोरी येथील प्रत्येक घडामोडींवर लक्ष राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील बोरी येथील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी ग्रामस्थ, व्यापारी व ग्रामपंचायत कार्यालयाने १० लाख रुपयांचा निधी खर्च करुन ८ मार्च रोजी ६२ सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाच्या ठिकाणी बसविले आहेत. त्यामुळे या कॅमेऱ्याद्वारे बोरी येथील प्रत्येक घडामोडींवर लक्ष राहणार आहे.
जिंतूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून बोरी ग्रा.पं. ओळखली जाते. बोरी येथे मागील काही दिवसांत गुन्हेगारीच्या मोठ्या घटना वाढल्या होत्या. यामध्ये एका बालिकेवर अत्याचाराची घटनाही घडली होती. त्याच बरोबर भर वस्तीतून घरासमोरील बैलजोडी चोरीला जाणे आदी घटना घडल्या होत्या. या घटनांचा छडा लावताना पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली होती. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी, गुन्हेगारीला आळा बसावा, या हेतुने ग्रामपंचायत कार्यालय, व्यापारी, ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन १० लाख रुपयांचा निधी उभारला. या निधीतून ६२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची खरेदी करण्यात आली. हे कॅमेरे बोरी गावातील बाजारपेठ, शाळा, विद्यालय, मंदिर यासह मोक्याच्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. यावेळी आ.विजय भांबळे, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, जि.प. सदस्य अजय चौधरी, सरपंच सखाराम शिंपले, उपसरपंच अश्विनीताई चौधरी, सुभाष घोलप, मनोज थिटे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.