परभणी : ६३ टक्के बालकांना वाचता येतो धडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:17 AM2019-01-17T00:17:37+5:302019-01-17T00:18:02+5:30
जिल्ह्यातील तिसरी ते पाचवीच्या ६३ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचता येत असल्याची बाब असर या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अहवालात समोर आली आहे़ २०१८ मध्ये असरच्या वतीने देशभरात या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले होते़ त्याचा अहवाल सोमवारी जाहीर करण्यात आला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील तिसरी ते पाचवीच्या ६३ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचता येत असल्याची बाब असर या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अहवालात समोर आली आहे़ २०१८ मध्ये असरच्या वतीने देशभरात या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले होते़ त्याचा अहवाल सोमवारी जाहीर करण्यात आला़
शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या असर या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने देशभर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची स्थिती, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा आदी बाबतचे सर्वेक्षण केले जाते़ असर संस्थेच्या वतीेने २०१८ मध्ये देशभर या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आले़ याबाबतचा अहवाल सोमवारी संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे़ त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील शिक्षणाची स्थिती काय आहे? याबाबतची माहिती असर या संस्थेचे मुंबई येथील अधिकारी भालचंद्र सहारे यांच्याकडून घेतली असता, परभणी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची स्थिती बºयापैकी असल्याची बाब समोर आली आहे़ असरच्या अहवालानुसार राज्यात ६ वर्षापर्यंत ९९़२ टक्के बालके शाळेमध्ये जातात़ तर परभणी जिल्ह्यातील ९९़८ टक्के म्हणजेच जवळपास १०० टक्के बालके शाळेत जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे़ राज्यातील ३७़६ टक्के मुले खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेतात़ त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील २०़७ टक्के मुले खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याचे आढळून आल्याचे असरचे म्हणणे आहे़ त्यामुळे इंग्रजी शाळांचे वाढते पेव फुटले असताना पालकांचा अद्यापही जिल्हा परिषद शाळांवर विश्वास असल्याचे या माध्यमातून अधोरेखित झाले आहे़ तिसरी ते पाचवी या वर्गापर्यंतच्या जिल्ह्यातील ६३ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडे वाचता येतात़ महाराष्ट्रात मात्र ५५़५ टक्के बालकांना धडे वाचता येतात, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे़ तिसरी ते पाचवीपर्यंतच्या जिल्ह्यातील ४९़५ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी व भागाकार येतो तर हेच प्रमाण राज्यात ४४़८ टक्के आहे़ यामध्ये राज्यात रत्नागिरी जिल्हा प्रथम असून, सातारा जिल्हा द्वितीय तर पुणे जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे़ परभणी जिल्ह्याची याबाबतीत पिछेहट असल्याचे समोर आले आहे़
राज्यात परभणी जिल्हा चौथ्या क्रमांकावर
सहावी ते आठवी वर्गातील जिल्ह्यातील ८८़५ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचता येतो़ राज्यात हे प्रमाण ७७़५ टक्के आहे़ याबाबीमध्ये परभणी जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे़ पहिल्या क्रमांकावर पुणे, दुसºया क्रमांकावर रत्नागिरी तर तिसºया क्रमांकावर सिंधूदुर्ग जिल्हा आहे़ सहावी ते आठवीमधील जिल्ह्यातील ४०़३ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी व भागाकार येतो़ राज्यामध्ये हे प्रमाण ३८़३ टक्के आहे़ यात सिंधूदुर्ग जिल्हा प्रथम, रत्नागिरी द्वितीय तर पुणे जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे़ याबाबीत मात्र परभणी जिल्हा पिछाडलेला दिसून येत आहे़