परभणी : बिंदू नामावलीने जि.प.चे ६५ शिक्षक अतिरिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:32 AM2018-11-24T00:32:29+5:302018-11-24T00:32:57+5:30
आंतरजिल्हा बदलीने चार वर्षांपूर्वी परभणीत आलेल्यांपैकी बिंदू नामावलीनुसार ६५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांना जिल्हा परिषदेने सामावून घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आंतरजिल्हा बदलीने चार वर्षांपूर्वी परभणीत आलेल्यांपैकी बिंदू नामावलीनुसार ६५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांनाजिल्हा परिषदेने सामावून घेतले आहे.
२०१४ मध्ये आंतर जिल्हा बदली प्रक्रिया संपन्न झाली होती; परंतु, बिंदू नामावलीमुळे बीड जिल्हा परिषदेतील २७९ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय तेथील जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला होता. या विरोधात संबंधित शिक्षकांनी आंदोलनही केले. आता या कारवाईला तेथील प्रशासनाने स्थगिती दिली असली तरी इतर जिल्ह्यांमध्ये याच प्रक्रियेअंतर्गत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची चर्चा होऊ लागली आहे.
परभणी जिल्ह्यात असे ६५ शिक्षक चार वर्षांपूर्वी अतिरिक्त ठरले होते. या शिक्षकांना परत त्यांच्या जिल्ह्यात न पाठवता जिल्हा परिषदेने सामावून घेतले असल्याची बाब बीडच्या आंदोलनानंतर समोर आली. विशेष म्हणजे, हे प्रकरण जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व काही अधिकाºयांना माहीत नव्हते. बीडच्या प्रकरणानंतर परभणी जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात या संदर्भात चर्चा झाली. त्यानंतर या शिक्षकांची माहिती समोर आली. या शिक्षकांच्या बिंदू नामावलीतही काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.
नियुक्त्या देताना संबंधित शिक्षक एका प्रवर्गातून नोकरीस लागले व नंतर त्यांचा दुसºया प्रवर्गात समावेश करण्यात आला, असा या तक्रारींचा सूर होता. या प्रकरणी ठोस निर्णय विभागीय आयुक्त स्तरावरुन झालेला नाही.