परभणी : ७० कि.मी. पाठलाग करुन पकडले दरोडेखोरांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:47 AM2019-02-02T00:47:39+5:302019-02-02T00:48:05+5:30
घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड येथील आखाडा लुटून ट्रकसह पळून जाणाऱ्या पाच पैकी तीन दरोडेखोरांच्या ७० कि.मी. पाठलाग करुन पाथरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दोन आरोपी फरार झाले आहेत. ही घटना ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड येथील आखाडा लुटून ट्रकसह पळून जाणाऱ्या पाच पैकी तीन दरोडेखोरांच्या ७० कि.मी. पाठलाग करुन पाथरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दोन आरोपी फरार झाले आहेत. ही घटना ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड येथील अंबड- पाथरी रस्त्यावरील शेतकरी लक्ष्मण अश्रोबा सावंत यांच्या शेतातील आखाड्यावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी सोबत आणलेल्या ट्रकमध्ये २० पोते सोयाबीन, एक शेळी, दोन पिल्ले, रसवंतीचे फायबर टेबल, गल्ल्यातील अडीच हजार रुपये एम.एच.२१-२२४९ क्रमांकाची मोटारसायकल असा ऐवज टाकून धूम ठोकली. याबाबतची माहिती घनसावंगी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी या दरोडेखोरांचा पाठलाग सुरु केला. पाथरी पोलिसांना याबाबतची माहिती घनसावंगी पोलिसांकडून रात्री ११.३० वाजेच्या सुमारास देण्यात आली. यावेळी पाथरीतील पोलीस उपनिरीक्षक आवेज काजी, चालक रवि शिंदे हे कर्मचाºयांसह पेट्रोलिंग करीत होते. त्यांना एम.एच.०६- ४५७३ या क्रमांकाचा ट्रक पाथरीच्या दिशेने येत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तातडीने फौजदार काजी हे पथकासह पाथरीपासून ३ कि.मी.अंतरावर आष्टी फाट्यावर पोहचले. त्यांनी पाथरी ठाण्याच्याच पेट्रोलिंग करणाºया दुसºया जीपलाही बोलावून घेतले. तोपर्यंत आष्टीकडून येणाºया ट्रकने समोर पोलिसांची जीप पाहून विरुद्ध दिशेने माजलगावकडे सुसाटवेगाने ट्रक नेला. घनसावंगी पोलीस येण्यापूर्वीच पाथरी पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग सुरु केला. त्यावेळी दरोडेखोरांनी दोन्ही वाहने वेगात असताना ट्रकमधील सोयाबीनचे पोते पोलिसांच्या जीपवर फेकून दिले.
चालक रवि शिंदे यांनी शिताफीने वाहन चालविले. त्यामुळे ते बचावले. त्यानंतर दरोडेखोरांनी सोबतची शेळी पोलिसांच्या जीपवर फेकून दिली. त्यापासूनची बचाव करीत चालक शिंदे यांनी दरोडेखोरांचा पाठलाग सुरुच ठेवला. यामध्ये दोन वेळा त्यांना रस्त्याच्या कडेला जावे लागले. यात ते बालंबाल बचावले. आरोपी माजलगावकडे न जाता तेलगावफाटा निघाले. तेलगावफाटा ओलांडून ट्रक धारुरच्या दिशेने निघाला. या दरम्यान पोलिसांनी अनेक वेळा दरोडेखोरांच्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला; परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. याबाबतची माहिती धारुर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर धारुर पोलीसही घाटापर्यंत जीप घेऊन आले. घाट ओलांडण्यापूर्वीच ओव्हरटेक करून पाथरी पोलिसांनी मध्यरात्री २ वाजता ट्रक अडविला.
काही वेळात समोरुन धारुर पोलिसांची जीप तर पाठीमागून घनसावंगी पोलिसांची जीप दाखल झाली. याच दरम्यान, दोन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. तर तिघांना ताब्यात घेतले. तब्बल ७० कि.मी. ट्रकचा पाठलाग करुन पाथरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सुटकेलचा नि:श्वास सोडला.
वाहन बंद पडल्याचा केला होता बनाव
४घनसावंगी तालुक्यातील सिंदखेडा शिवारात रस्त्यालगत शेतकरी लक्ष्मण सावंत यांचे रसवंतीचे दुकान आहे. घरी जेवण करुन ते रात्री शेत शिवारात आले असता त्यांना त्यांच्या रसवंतीसमोर दोन ट्रक उभ्या दिसल्या. त्यांनी विचारणा केली असता एकाने ट्रक पंक्चर झाल्याने थांबविला आहे, आम्हाला कारखान्याला जायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर रसवंतीमध्ये सावंत झोपले. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास एका ट्रकमधील पाचपैकी दोघे त्यांच्याजवळ आले. त्यांच्या हातात कोयते होते. त्यांनी आरडाओरडा करशील तर ठार मारु अशी धमकी दिली. त्यांचे हातपाय मफलर व साडीच्या सहाय्याने बांधून त्यांना मारहाण केली. त्यानंतर आखाड्यावरील साहित्य घेऊन ते पसार झाले.
पाठलागाचे केले शुटींग
४पाथरी पोलिसांनी तब्बल ७० कि.मी. दरोडेखोरांचा पाठलाग केला. या सर्व घटनाक्रमाचे पोलिसांनी चित्रीकरण केले आहे. हे चित्रीकरण पाहताना अंगावर शहारे येतात. पाथरी पोलिसांची ही धाडसी कामगिरी कौतुकास्पद असल्याची चर्चा परिसरात होताना दिसून येत आहे.