परभणी : ७२ क्विंटलने वाढला जिल्ह्याचा धान्य कोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:05 AM2018-11-18T00:05:26+5:302018-11-18T00:06:10+5:30
जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांच्या आॅनलाईन नोंदणीमध्ये समाविष्ट केलेल्या माहितीवरून जिल्ह्यात अंत्योदय योजनेच्या २०५ शिधापत्रिकांची वाढ झाली असून, या शिधापत्रिकाधारकांसाठी ७१़७५ क्विंटल वाढीव धान्य डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्याला मिळणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांच्या आॅनलाईन नोंदणीमध्ये समाविष्ट केलेल्या माहितीवरून जिल्ह्यात अंत्योदय योजनेच्या २०५ शिधापत्रिकांची वाढ झाली असून, या शिधापत्रिकाधारकांसाठी ७१़७५ क्विंटल वाढीव धान्य डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्याला मिळणार आहे़
महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लाभार्थ्यांच्या इष्टांकामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे़ अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटूंबातील लाभार्थ्यांचे दोन गट करण्यात आले असून, त्यानुसार जिल्ह्याचा इष्टांक ठरविण्यात आला आहे़ १३ आॅक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत शिधापत्रिकांचा आॅनलाईन समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ या सूचनेनुसार जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे आॅनलाईन सिडिंग करण्यात आले़ आधार क्रमांक आणि इतर माहिती शासनाला सादर करण्यात आली़ त्यानंतर ३० सप्टेंबर २०१६ रोजी कार्यरत असलेल्या शिधापत्रिकेच्या संख्येनुसार ३ मार्च २०१७ रोजी जिल्हानिहाय सुधारित इष्टांक दिला होता़ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत जिल्ह्यातील शिधापत्रिकांच्या इष्टांकांची नव्याने सुधारणा करण्यात आली़ या सुधारणेनुसार जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या माहितीच्या अन्वये परभणी जिल्ह्यासाठी अंत्योदय लाभार्थ्यांच्या ४५ हजार ८०६ शिधापत्रिकांना मंजुरी दिली असून, प्राधान्यक्रम गटातील १० लाख ५४ हजार ७२ लाभार्थ्यांना पुरवठा विभागाने मंजुरी दिली आहे़ डिसेंबर महिन्यापासून हा नवीन सुधारित इष्टांक जिल्ह्याला प्राप्त झाला आहे़ या इष्टांकानुसार पूर्वीच्या तुलनेने ७२ क्विंटल अन्नधान्य अधिकचे मिळणार आहे़
दोन गटांत केली विभागणी
४शासनाच्या निर्देशानुसार अंत्योदय, प्राधान्यक्रम लाभार्थ्यांची शहरी आणि ग्रामीण अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे़ परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागात अंत्योदयच्या ३३ हजार ५३३ शिधापत्रिका असून, प्राधान्यक्रम गटातील ८ लाख ४८ हजार ६०० लाभार्थी आहेत़ शहरी भागात १२ हजार २७३ शिधापिकत्रा अंत्योदय प्रकारात असून, २ लाख ५ हजार ४७२ प्राधान्यक्रमचे लाभार्थी आहेत़ शासनाने केलेल्या विभागणीनुसार शिधापत्रिकाधारकांना धान्याचा पुरवठा करावा़ शहरी आणि ग्रामीण भागातील वेगवेगळा इष्टांक दिला असून, त्याप्रमाणे स्वतंत्र इष्टांकपूर्ती करावी, या इष्टांकांची एकमेकांशी सरमिसळ होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाचे सहसचिव स़श्री़ सुपे यांनी दिले आहेत़
मोहीम राबविण्याच्या सूचना
४राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार शिधापत्रिकांवरील सर्व सदस्यांचे आधार सीडिंग करण्याची मोहीम तात्काळ सुरू करावी़ तसेच वेळोवेळी मोहीम राबवून आधार सिडींगच्या आधारे सध्या लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी अपात्र, दुबार, स्थलांतरित आणि मयत लाभार्थ्यांना प्राधान्य क्रमाने वगळावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत़ जिल्ह्यात लाभार्थ्यांची आधार सिडींग करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ जवळपास ७५ टक्के लाभार्थ्यांचे आधार क्रमांक पुरवठा विभागाकडे उपलब्ध झाले आहे़ या आदेशामुळे आधार सिडींगला नव्याने गती मिळण्याची शक्यता आहे़
अंत्योदयच्या कार्डांची संख्या वाढली
दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना शासनाच्या पुरवठा विभागामार्फत सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य पुरवठा केला जातो़ परभणी जिल्ह्यामध्ये ३ मार्च २०१७ च्या यादीनुसार अंत्योदय योजनेसाठी ४५ हजार ६०१ शिधापत्रिका मंजूर होत्या़ शासनाच्या निर्देशानुसार या शिधापत्रिकांचे सर्व्हेक्षण केल्यानंतर २०५ शिधापत्रिकांची वाढ झाली असून, सध्या अंत्योदयसाठी ४५ हजार ८०६ शिधापत्रिका मंजूर आहेत़ शासनाच्या केलेल्या सुधारणेनुसार या लाभार्थ्यांसाठी धान्य कोटा दिला जाणार आहे़ एका कार्डाला ३५ किलो धान्य या प्रमाणे ७१ क्विंटल ७५ किलो वाढीव धान्य जिल्ह्याला मिळणार आहे़