परभणी : ७७ गावे दुष्काळापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:35 AM2019-01-15T00:35:55+5:302019-01-15T00:37:02+5:30
जिल्ह्यात परतीचा पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, राज्य शासनाने टप्प्या टप्प्याने जाहीर केलेल्या दुष्काळातून जिल्ह्यातील सुमारे ७७ गावांना वगळण्यात आले आहे़ या गावांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे कारण देत ही गावे दुष्काळी योजनांमध्ये समाविष्ट झाली नसली तरी या गावांमध्येही चारा व पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात परतीचा पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, राज्य शासनाने टप्प्या टप्प्याने जाहीर केलेल्या दुष्काळातून जिल्ह्यातील सुमारे ७७ गावांना वगळण्यात आले आहे़ या गावांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे कारण देत ही गावे दुष्काळी योजनांमध्ये समाविष्ट झाली नसली तरी या गावांमध्येही चारा व पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत़
परभणी जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ७७४ मिमी एवढी असून, संपूर्ण जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नाही़ मोसमी पावसाच्या काळात पूर्णा तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस झाला आणि या तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली़ विशेष म्हणजे पूर्णा तालुक्यातही परतीचा पाऊस झाला नसल्याने रबी हंगामाला फटका बसला आहे; परंतु, या तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडल्याचा फटका दुष्काळी योजनांच्या सवलतीला बसला आहे़ राज्य शासनाने तीन टप्प्यामध्ये दुष्काळाची घोषणा केली़ तिन्ही टप्प्यातील निकषांमध्ये पूर्णा तालुक्यातील पूर्णा, चंडावा, कात्नेश्वर आणि ताडकळस ही चार मंडळे बसली नाहीत़ त्यामुळे या चार मंडळांमधील ७७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला नाही़ शासनाने दुष्काळ जाहीर झालेल्या गावात जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या वीज देयकांत ३३़५ टक्के सवलत, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात शिथीलता, आवश्यक त्या ठिकाणी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये वीज पंपाची जोडणी खंडीत न करण्याच्या सवलती दिल्या आहेत़ मात्र या सवलतींपासून ७७ गावे वंचित राहणार आहेत़ विशेष म्हणजे पूर्णा तालुक्यातील या गावांमध्ये सद्यस्थितीला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ पावसाचे प्रमाण अधिक असले तरी या गावात परतीचा पाऊस झाला नाही़ परिणामी रबीच्या पेरण्या रखडल्या असून, संपूर्ण हंगामावर पाणी सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़ तसेच सद्यस्थितीला परिसरात पाण्याची टंचाईही निर्माण झाली आहे़ भूजल पातळीत घट होत असल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे; परंतु, शासनाच्या निकषात न बसल्याने ही गावे दुष्काळाच्या सवलतींपासून वंचित राहणार आहेत़
परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी ३५ मंडळांत दुष्काळ
परभणी जिल्ह्यामध्ये ३९ मंडळे असून, त्यापैकी पूर्णा तालुक्यातील चार मंडळे वगळता ३५ मंडळांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे़ दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधील तरतुदी व निकषांचा विचार करून पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील परभणी, पालम, पाथरी, मानवत, सोनपेठ आणि सेलू या सहा तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला़ त्यामुळे परभणी तालुक्यातील १३१, पालम ८२, पाथरी ५८, मानवत ५४, सोनपेठ ६० आणि सेलू तालुक्यातील ९४ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली़ दुसºया टप्प्यामध्ये मंडळनिहाय विचार करण्यात आला़ ज्या मंडळांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी सरासरी पाऊस झाला आहे, त्या मंडळांना दुष्काळी यादीत समाविष्ट करण्यात आले़ त्यात गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी, राणीसावरगाव, जिंतूर तालुक्यातील जिंतूर, बोरी, आडगाव, चारठाणा आणि पूर्णा तालुक्यातील लिमला या मंडळांचा दुष्काळी मंडळांमध्ये समावेश केल्याने २१३ गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला़ तिसºया टप्प्यामध्ये पैसेवारीचा निकष लावण्यात आला़ ज्या गावांमध्ये अंतीम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे, त्या गावात दुष्काळी सवलती लागू करण्यास मंजुरी देण्यात आली़ या टप्प्यात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा व बामणी या तीन मंडळांचा समावेश करण्यात आला़ त्यामुळे दुष्काळाच्या यादीत आणखी ८० गावांची भर पडली़ तीनही टप्प्यांमध्ये जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी ३५ मंडळे समाविष्ट झाली आहेत़