पारभणी : पावसाळ्याच्या तोंडावर ९४ टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:01 AM2019-06-10T00:01:17+5:302019-06-10T00:02:31+5:30
शनिवारपासून प्रत्यक्षात पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी जिल्ह्यातील पाणीटंचाई अद्यापही हटली नसून ग्रामीण भागातील ९४ टंचाईग्रस्त गावांना ९४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या संख्येवरुनच यावर्षीच्या पाणीटंचाई गांभीर्य समोर येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शनिवारपासून प्रत्यक्षात पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी जिल्ह्यातील पाणीटंचाई अद्यापही हटली नसून ग्रामीण भागातील ९४ टंचाईग्रस्त गावांना ९४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या संख्येवरुनच यावर्षीच्या पाणीटंचाई गांभीर्य समोर येत आहे.
येलदरी, निम्न दुधना, करपरा, मासोळी या प्रमुख प्रकल्पांवर परभणी जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची आणि शेती सिंचनाची भिस्त आहे. मात्र मागील काही वर्षांपासून प्रकल्पांत पाणीसाठा होत नसल्याने टंचाई वाढत चाललेली आहे. मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात सरासरीच्या ३३ टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच जिल्ह्याला पाणीटंचाईने ग्रासले. येलदरी प्रकल्पामध्ये शिल्लक असलेले पाणीही संपले असून निम्न दुधना प्रकल्पाचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली आहे.
पावसाळा तोंडावर आला आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा पाऊस लांबण्याची शक्यता वर्तविल्याने नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतर प्रकल्पांमध्ये पाणीसाठा होण्याइतपत मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने पाणीटंचाईला पूर्णविराम मिळेल. सध्या तरी जिल्ह्यातील ९४ गावांमध्ये ९४ टँकरच्या सहाय्याने प्रशासन टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करीत आहे. याशिवाय विहीर अधिग्रहण, नळ योजनांची दुरुस्ती आदी माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अद्यापपर्यंत मान्सूनचा पाऊस झाला नसल्याने आणखी किमान १५ दिवस जिल्हा प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, अशी शक्यता आहे.
पालम तालुक्यात सर्वाधिक टँकर
४पाणीटंचाईची सर्वाधिक झळ पालम तालुक्याला बसली आहे. गोदावरी नदीच्या पाण्यावर संपूर्ण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. मात्र गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडल्याने पालम तालुक्यात टंचाई वाढली आहे.
४ सध्या तालुक्यातील १५ गावे आणि ७ वाड्यांना २३ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. त्या खालोखाल जिंतूर तालुक्यातील १६ गावांना १६ टँकर, पूर्णा तालुक्यातील ११ गावांना १४, गंगाखेड तालुक्यातील ६ गावे आणि ८ वाड्यांना १४.
४ सेलू तालुक्यातील १० गावांना ११, मानवत तालुक्यातील ६ गावांना ६, सोनपेठ तालुक्यातील ५ गावांना ५, परभणी तालुक्यातील ६ गावांना ४ आणि पाथरी तालुक्यात एका टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
सव्वा लाख: ग्रामस्थांना टँकरचे पाणी
४जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने टँकर सुरु केले आहे. ज्या गावामध्ये कोणताही पाणीस्त्रोत उपलब्ध नाही, अशा गावांना दूर अंतरावरुन टँकरने पाणी आणून पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील १ लाख २५ हजार १७ ग्रामस्थांना टँकरचे पाणी दिले जात आहे.
४त्यामध्ये परभणी तालुक्यातील ९७९, पालम २६ हजार ५५३, पूर्णा १६ हजार ४५२, गंगाखेड ८ हजार ३७२, सोनपेठ ८ हजार ३०३, सेलू ३३ हजार ४७९, जिंतूर २१ हजार ९६ आणि मानवत तालुक्यातील ९ हजार ७८३ ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
ही आहेत जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावे
४परभणी तालुका- गोविंदपूर, सारंगपूर, इस्माईलपूर, पेडगाव, सिंगणापूर, माळसोन्ना. पालम तालुका-चाटोरी, नाव्हा, आनंदवाडी, रामापूर तांडा, पेंडू खु., सादलापूर, पेंडू बु., बांदरवाडी, पेठशिवणी, पेठपिंपळगाव, सातेगाव, कापसी, पारवा, फुरतलाव तांडा, गंजी तांडा, पायरीका तांडा, वाडी बु., मार्तंडवाडी, नरहटवाडी, सेलू वलंगवाडी, कोळेवाडी.
४पूर्णा तालुका- पिंपळा लोखंडे, बरबडी, देगाव, आहेरवाडी, गोविंदपूर, हिवरा, पांगरा लासीना, पिंपळा भत्या, धानोरा, गौर, वाई लासीना. गंगाखेड तालुका- गोदावरी तांडा, उमलानाईक तांडा, खंडाळी, विठ्ठलवाडी, इळेगाव, गुंडेवाडी, सिरसम शेख, गणेशपुरी मठ, सुरळवाडी, महातपुरी तांडा, उमटवाडी, ढवळकेवाडी, फत्तूनाईक तांडा, घटांग्रा तांडा.
४सोनपेठ तालुका- नरवाडी, कोथाळा, खपाट पिंपरी, डिघोळ, वंदन. पाथरी तालुका- रेणाखळी. सेलू तालुका- तळतुंबा, वालूर, पिंपरी गौंडगे, नागठाणा, कुंभारी, पिंपळगाव गोसावी, गुळखंड, मोरेगाव, शिराळा, देवगाव. जिंतूर तालुका- मांडवा, करवली, कोरवाडी, देवसडी, मोहाडी, वाघी धानोरा, वडी, घागरा, भोसी, पांगरी, पानमोडी, गणपूर, सावंगी भांबळे, पाचलेगाव, चारठाणा, शेवडी. मानवत तालुका- पाळोदी, सोनुळा, हातळवाडी, सावळी, कोल्हा, करंजी.