परभणी : ‘एसआरटी’चे ९२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 11:59 PM2020-02-16T23:59:23+5:302020-02-16T23:59:56+5:30

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सीबीसीएस पॅटर्नच्या धर्तीवर राबविलेल्या परीक्षा पद्धतीचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून विद्यापीठातील पहिल्या सत्रात कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेच्या निकालांची सरासरी केवळ ८.१६ टक्के असून ९२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

Parbhani: 90% of SRT students fail | परभणी : ‘एसआरटी’चे ९२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण

परभणी : ‘एसआरटी’चे ९२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण

Next

विजय चोरडिया।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सीबीसीएस पॅटर्नच्या धर्तीवर राबविलेल्या परीक्षा पद्धतीचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून विद्यापीठातील पहिल्या सत्रात कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेच्या निकालांची सरासरी केवळ ८.१६ टक्के असून ९२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रथम सत्राचे निकाल जाहीर झाले आहेत. विद्यापीठांतर्गत कला शाखेत प्रथम वर्षात १५ हजार ४३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ ६९४ विद्यार्थी (४.५० टक्के) उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत ८ हजार ९२४ विद्यार्थ्यांपैकी केवळ १ हजार ११५ (१२.४९ टक्के) उत्तीर्ण झाले. तर विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात ८ हजार १०४ विद्यार्थ्यांपैकी ६०७ विद्यार्थी (७.४९ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. विद्यापीठाच्या निकषाप्रमाणे व परीक्षा पद्धातीनुसार ज्ञानार्जन करुन विद्यार्थी परीक्षा देतात. मात्र विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
विद्यापीठाने सातत्याने परीक्षा पद्धतीत बदल केला. सेमिस्टर बंद करुन एमसीक्यू पॅटर्न लागू केला. कलांतराने हा पॅटर्नही बंद करुन सीजीपीए पॅटर्न सुरु केला. हा पॅटर्नही कालबाह्य असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने चॉईस बेस क्रेडीट सिस्टिम म्हणजे सीबीसीएस पॅटर्न लागू केला.
या पद्धतीत एकावेळी दोन-दोन पेपर विद्यार्थ्यांना सोडवावे लागले. परीक्षेचा कालावधी कमी व्हावा, यासाठी विद्यापीठाने केलेला हा खटाटोप विद्यार्थ्याच्या आयुष्यातील जडणघडणीत अडचण ठरत आहे. याबाबत महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यापीठ समितीवरील तज्ञ व्यक्ती, विद्यापीठ व्यवस्थापन ब्र काढण्यासही तयार नाही; परंतु, दुसरीकडे या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे.
बीसीए, बीसीएस विद्यार्थ्यांवर अन्याय
४बीसीए, बीसीएस परीक्षा सेमिस्टरमध्ये घेत असताना विद्यापीठाने मोठी चूक केली. या विद्यार्थ्यांना लॉजिकल रेसलिंग नावाच्या पेपरला जुन्या व नव्या अभ्यासक्रमासाठी एकच पेपर दिला.
४बहुपर्यायी प्रश्नपत्रिका देताना सलग प्रश्न देण्यात आले. प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. ८० प्रश्न असताना ४० प्रश्नांच्या उत्तराचा चार्ट देण्यात आला. विशेष म्हणजे, नेमकी कोणती उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना द्यावी, याचा थोडाही अभ्यास विद्यापीठ व प्राध्यापकांना नव्हता.
४परिणामी चुकीची उत्तरपत्रिका देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान केले. शिवाय विद्यापीठाची चूक असताना १६ महाविद्यालयांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागविले. या सर्व गोंधळामुळे चार महिन्यांपासून हे विद्यार्थी निकालापासून वंचित आहेत.
तासिकांपेक्षा परीक्षांचा कालावधी अधिक
४स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या नियमानुसार महाविद्यालयाला १८० दिवस तासिका घ्याव्या लागतात. त्यात ४० ते ४५ दिवस पहिले सत्र (सेमिस्टर) व ४० ते ४२ दिवस दुसºया सत्रातील परीक्षा चालतात.
४९० दिवस परीक्षांचा कालावधी केल्याने उरलेल्या ९० दिवसांत शासकीय सुट्ट्या, रविवार, महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रजा याचा विचार करता संपूर्ण अभ्यासक्रम केवळ ४० ते ४५ दिवसांमध्ये शिकवावा लागतो.
४प्राध्यापकांची शिकविण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाची कुवत याचा कोणताही विचार विद्यापीठाने केल्याचे दिसत नाही.
विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक व महाविद्यालयाच्या कामांचे दिवस यामध्ये ताळमेळ नाही. परिणामी लांब झालेल्या परीक्षेचा कालावधीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. सलग दीड तासाचे दोन पेपर एकाच वेळी विद्यार्थ्यांना सोडवावे लागत असल्याने अभ्यासाचा व पेपर सोडविण्याचा परिणाम निकालावर होत आहे.
-अ‍ॅड.अशोक सोनी, माजी व्यवस्थापन समिती सदस्य, स्वारातीमवि.
या परीक्षा पद्धतीत विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन प्रश्नपत्रिका देऊन सोयीनुसार त्यांना उत्तरे देण्याची मुभा देण्याची गरज असताना अनेक महाविद्यालयांना नेमकी परीक्षा पद्धती कशी? याचीच माहिती नव्हती. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर कोणत्या दिवशी आहे, याचीही माहिती नव्हती. विद्यापीठाने परीक्षेचा कालावधी कमी करण्याच्या नादात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाकडे पाहिले नाही.
-डॉ.अंबादास कदम, सिनेट सदस्य, स्वारातीमवि, नांदेड
सीबीसीएस परीक्षा पद्धतीनुसार घेतलेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांचा निकाल का कमी लागला, याची विचारणा लेखी पत्राद्वारे कुलगुरुंकडे केली आहे. येत्या १२ मार्च रोजी होणाºया सिनेटच्या सभेत चर्चा होणार आहे.
-नारायण चौधरी, सिनेट सदस्य
यावर्षी एमसीक्यू पॅटर्न बंद करण्यात आला. थेअरीचे दोन पेपर एकत्र केल्या गेले. तसेच परीक्षा केंद्राची आदलाबदल केल्याने निकाल कमी लागला असावा, अशी शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी आता पूर्ण तयारीनिशी परीक्षा देणे गरजचे आहे.
-रवि सरवदे, परीक्षा नियंत्रक
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.

Web Title: Parbhani: 90% of SRT students fail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.