परभणी : अर्धवट काम करणाऱ्या गुत्तेदारांना मनपाचे अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:59 PM2020-01-15T23:59:31+5:302020-01-16T00:00:19+5:30
शहरात लाखो रुपयांची कामे अर्धवट अवस्थेत सोडणाºया कंत्राटदारांना महानगरपालिकेकडून अभय दिले जात असून याबाबत होणाºया राजकीय हस्तक्षेपाबाबत अधिकाऱ्यांनीही चुप्पी साधली आहे. परिणामी अनेक महिन्यांपासून शहरात विकासकामे प्रलंबित राहत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरात लाखो रुपयांची कामे अर्धवट अवस्थेत सोडणाºया कंत्राटदारांना महानगरपालिकेकडून अभय दिले जात असून याबाबत होणाºया राजकीय हस्तक्षेपाबाबत अधिकाऱ्यांनीही चुप्पी साधली आहे. परिणामी अनेक महिन्यांपासून शहरात विकासकामे प्रलंबित राहत आहेत.
महानगरपालिकेत प्रमुख पदांवर कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने विकासकामांवर त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मनपाच्या वतीने करण्यात येत आहेत;परंतु, या कामाची देखरेख ११ महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेल्या अभियंत्याकडून केली जात आहे. परिणामी होणाºया कामांची स्थिती दयनीय आहे. सदरील कामे करणाºया कंत्राटदारांची मनपातील पदाधिकाºयांसोबत उठबैस असल्याने त्यांच्याकडून अर्धवट कामे सोडून देण्यात आली तरी कोणीही संबंधित कंत्राटदारांना चकार शब्द काढत नाही. त्यामुळे अनेक महिन्यांपासून ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशीद या कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याचे काम २०१६ मध्ये सुरु करण्यात आले होते. यासाठी निधीची तरतूदही मुबलक प्रमाणात उपलब्ध होती; परंतु, सदरील कंत्राटदाराने हे काम पूर्णच केले नाही. जवळपास साडेतीन वर्षानंतरही हे काम अर्धवटच आहे. या रस्त्यांच्या दुभाजकांचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुुंना असलेल्या नाल्यांवरील ढाप्याचे तसेच एका बाजूच्या नालीचे कामही पूर्ण करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे हे काम एकाच कंत्राटदाराला दिलेले असताना त्याचे तुकडे करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा या दरम्यान एका कंत्राटदाराने तर त्यापुढील काम दुसºयाच कंत्राटदाराने केले. विशेष म्हणजे, दोन्ही कामांच्या दर्जामध्ये व मोजमापांममध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. असे असताना संबधितांना पुर्ण कामाचे बिल अदा करण्यात आले आहे. याकडे मनपाच्या अधिकारी व पदाधिकाºयांना लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही. अशीच अवस्था महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाची आहे. या पुतळ्याच्या निर्मितीचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी काम अर्धवट असतानाच महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा झाला. आता विधानसभेच्या निवडणुका होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे; परंतु, सदरील कंत्राटदाराला हे काम पूर्ण करणे गरजेचे वाटलेले नाही. शहरातील वसमत रोड ते अक्षदा मंगल कार्यालयापासून कृषी विद्यापीठ रेल्वेगेट या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्यामुळे हे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाच वसमतरोड ते अक्षदा मंगल कार्यालय एवढेच काम पूर्ण करण्यात आले. त्यापुढील रस्त्याचे काम अर्धवट सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे, या रस्त्याचा निधी इतरत्र वळविण्यात आला. परिणामी, आजही या रस्त्याची दयनीय स्थिती आहे. शहरातील लोकमान्य नगरातही रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून अर्धवट सोडून देण्यात आले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी सातत्याने मनपाकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रातिनिधिक स्वरुपात ही काही उदाहरणे असली तरी अन्यही काही कामेही संबंधित कंत्राटदारांनी अर्धवट सोडली आहेत.
विशेष म्हणजे, अडीच वर्षापूर्वी ज्या कंत्राटदारांना तत्कालीन आयुक्त राहुल रेखावार यांनी काळ्या यादीत टाकले होते, त्याच कंत्राटदारावर सध्या मनपात चांगलीच मेहरबानी दाखविली जात आहे. असे असताना अधिकारी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.
दरम्यान, शहरातील बसस्थानका शेजारील अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा ते नीरज हॉटेल या रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. सदरील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्यावर खड्डे पडले आहेत.
नांदखेडा रस्त्याच्या अर्धवट सोडलेल्या कामाला लागला मुहूर्त
४शहरातील नानलपेठ कॉर्नर ते बेलेश्वर मंदिर या दरम्यानच्या रस्त्याचे काम मनपाच्या वतीने मंजूर करण्यात आले होते. हा रस्ताही वर्दळीचा असल्याने व अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने त्याच्या डांबरीकरणाचे काम वेगाने होण्याची अपेक्षा होती; परंतु, मनपाच्या अधिकारी-पदाधिकाºयांचा धाक नसल्याने सदरील कंत्राटदाराने हे काम पारदेश्वर मंदिरापर्यंतच केले. त्यापुढील काम अर्धवट सोडून देण्यात आल्याने नांदखेडा येणाºया वाहनधारक व नागरिकांना त्याचा चांगलाच त्रास सहन करावा. अनेक दिवसानंतर गुरुवारपासून पुन्हा या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यापुढे पुन्हा हे काम बंद पडणार नाही, याची मनपाच्या अधिकाºयांनी काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.