परभणी : केंद्र संचालकाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:44 AM2019-02-25T00:44:38+5:302019-02-25T00:45:02+5:30
बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका पूर्णा येथील परिरक्षक कार्यालयात जमा करुन परत जाणाऱ्या एका केंद्रसंचालकाच्या दुचाकीला २३ फेब्रुवारी रोजी कात्नेश्वर शिवारात अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी) : बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका पूर्णा येथील परिरक्षक कार्यालयात जमा करुन परत जाणाऱ्या एका केंद्रसंचालकाच्या दुचाकीला २३ फेब्रुवारी रोजी कात्नेश्वर शिवारात अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
एरंडेश्वर येथील बाळकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्र संचालक उद्धव महादू वाभळे (३३) हे बारावी परीक्षेच्या केंद्रावरील पाली भाषेच्या उत्तरपत्रिका पूर्णा येथील परिरक्षक कार्यालयात जमा करुन शनिवारी सायंकाळी दुचाकीने परभणीकडे जात होते. त्याचवेळी कात्नेश्वर शिवारात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. नागरिकांनी तातडीने त्यांना वसमत तालुक्यातील हट्टा येथील रुग्णवाहिकेच्या सहाय्याने परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारा दरम्यान उद्धव वाभळे यांचे निधन झाले. दरम्यान, या दुचाकीचा अपघात कसा झाला, याची माहिती मिळू शकली नाही. मयत शिक्षक उद्धव वाभळे हे हिंगोली जिल्ह्यातील उमरा येथील रहिवासी होते.