परभणी : एकाच कुटुंबातील १८ जणांची निर्दोष मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:33 PM2019-07-09T23:33:48+5:302019-07-09T23:34:08+5:30
शेख राजूर येथील एका खून प्रकरणामध्ये एकाच कुटूंबातील १८ जणांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्या़ ए़एम़ पाटील यांनी ६ जुलै रोजी दिले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शेख राजूर येथील एका खून प्रकरणामध्ये एकाच कुटूंबातील १८ जणांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्या़ ए़एम़ पाटील यांनी ६ जुलै रोजी दिले आहेत़
या प्रकरणाची अॅड़ अशोक सोनी यांनी दिलेली माहिती अशी, ३ जून २००९ रोजी पालम तालुक्यातील शेख राजूर येथे दामोधर कदम यांचा खून झाला होता़ या प्रकरणी भीमराव गलांडे यांनी शेख राजूर येथील रामराव कदम व त्यांच्या कुटूंबातील त्यांचे भाऊ, पुतणे, जावई यांच्या विरूद्ध पालम पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ पोलिसांनी प्रकरणाचा तपास केल्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले़ जिल्हा न्यायालयात अभियोग पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले़ साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जबाबातील तफावत तसेच आरोपींना झालेल्या जखमा फिर्यादी पक्षाने जाणीवपूर्वक लपविल्याचा युक्तीवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला़ तो ग्राह्य धरून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली़ आरोपीतर्फे अॅड़ अशोक सोनी यांनी काम पाहिले़ त्यांना अॅड़ पवन भुतडा, अॅड़ अशिष सोनी, अॅड़ पवन शर्मा यांनी सहकार्य केले़