परभणी : २७ कोटी ३५ लाखांचा कृती आराखडा तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:40 AM2020-02-22T00:40:05+5:302020-02-22T00:41:41+5:30
यावर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्व तयारी सुरू केली असून, त्या अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६७ गावे आणि १८३ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाल्यास उपाययोजना करण्यासाठी २७ कोटी ३५ लाख ९७ हजार रुपयांचा कृती आराखडा विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्व तयारी सुरू केली असून, त्या अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६७ गावे आणि १८३ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाल्यास उपाययोजना करण्यासाठी २७ कोटी ३५ लाख ९७ हजार रुपयांचा कृती आराखडा विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे़
जिल्ह्यात मागील वर्षीच्या पावसाळ्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला़ त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईच्या झळा मागील वर्षीच्या तुलनेत तेवढ्या तीव्र जाणवणार नसल्या तरी ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होवू शकते़ ही शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत़ उन्हाळ्यात पाणी पातळी खालावणे, सार्वजनिक हातपंप, विहिरींचे पाणी आटणे आणि प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होवून टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते़ अशा वेळी जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी संभाव्य कृती आराखडा तयार केला जातो़ यावर्षीही जिल्हा परिषद, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या अहवालावरुन संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ हा आराखडा जानेवारी ते जून २०२० याप्रमाणे ६ महिन्यांचा करण्यात आला आहे़ त्यात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात पाणीटंचाई निर्माण झाली तर त्यासाठी एकूण ७८६ योजना तयार करण्यात आल्या आहेत़ त्यावर साधारणत: १५ कोटी ७ लाख ९० हजार रुपयांचा खर्च होईल, असे प्रशासनाला अपेक्षित आहे़
एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी ४७२ योजनांची आखणी केली असून, त्यावर १२ कोटी २८ लाख ७ हजार रुपये खर्च होण्याचे अपेक्षित धरले आहे़ जिल्हा प्रशासनाने हा कृती आराखडा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे़ सद्यस्थितीला जिल्ह्यात पाणीटंचाई उद्भवलेली नाही़ मात्र भविष्यात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होवू शकते, अशा वेळी या कृती आराखड्यातून टंचाईची कामे केली जाणार आहेत़
जिंतूर तालुक्यासाठी सर्वाधिक तरतूद
४जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईचा आराखडा तयार करताना तालुकानिहाय आढावा घेतला आहे़ त्यात जिंतूर तालुक्यासाठी सर्वाधिक ४ कोटी ८९ लाख १८ हजार रुपयांची तरतूद केली आहे़
४या तालुक्यातील १६९ गावे आणि २६ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाली तर त्यासाठी १९७ योजनांची आखणी केली आहे़ त्याच प्रमाणे पूर्णा तालुक्यातील १९५ गावे आणि ४ वाड्यांसाठी ४ कोटी १ लाख ८४ हजार रुपयांची तरतूद केली आहे़
४गंगाखेड तालुक्यातील ११० गावे आणि ५६ वाड्यांसाठी ३ कोटी ५१ लाख ९४ हजार, परभणी तालुक्यात १६१ गावे व २४ वाड्यांसाठी ३ कोटी ४१ लाख ४५ हजार रुपयांची तरतूद केली आहे़
४सेलू तालुक्यातील १२७ गावे आणि ६ वाड्यांसाठी ३ कोटी १९ लाख १८ हजार, पालम तालुक्यातील १०७ गावे आणि ४३ वाड्यांसाठी ३ कोटी १३ लाख १७ हजार, मानवत तालुक्यातील ८१ गावे आणि ३ वाड्यांसाठी १ कोटी ९५ लाख ८२ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़
४ सोनपेठ तालुक्यातील ७९ गावे आणि १० वाड्यांसाठी १ कोटी ९० लाख ३९ हजार, पाथरी तालुक्यातील ३८ गावे आणि ११ वाड्यांसाठी १ कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ त्यामुळे प्रशासनस्तरावर उन्हाळ्याचे नियोजन सुरू असल्याचे दिसून येते़
...या योजना प्रशासन राबविणार
४ग्रामीण भागात टंचाई निर्माण झाल्यास नवीन विंधन विहिरी घेणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पुरक योजना, टँकरद्वारे पाणीपुरवठा आदी कामे केली जाणार आहेत़