परभणी : ८७ केरोसिन परवानाधारकांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 11:47 PM2018-10-08T23:47:51+5:302018-10-08T23:47:56+5:30
पुरवठा विभागाने दिलेल्या रॉकेलच्या वितरणात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील ८७ किरकोळ केरोसीन परवानाधारक दोषी आढळले असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पुरवठा विभागाने दिलेल्या रॉकेलच्या वितरणात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील ८७ किरकोळ केरोसीन परवानाधारक दोषी आढळले असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली़
जिंतूर तालुक्यात रॉकेल नियतन वितरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा प्रकार आॅगस्ट महिन्यात उघडकीस आला होता़ या प्रकरणी चौकशीच्या मागणीसाठी येलदरी येथील अर्धघाऊक विक्रेते श्यामसुंदर सारडा यांनी २ आॅक्टोबरपासून जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू केले होते़ त्यानंतर या प्रकरणी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या नायब तहसीलदारांची चार चौकशी पथके स्थापन करण्यात आली होती़
३ ते ५ आॅक्टोबर या कालावधीत या पथकाने तालुक्यातील सर्व किरकोळ केरोसीन परवानाधारक विक्रेत्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली़ त्यामध्ये ८७ किरकोळ केरोसीन परवानाधारक विक्रेत्यांनी अनियमितता केल्याचे उघडकीस आले़
चार पैकी तीन पथकांचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे़ एका पथकाचा अहवाल मंगळवारपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे़ चारही पथकांच्या एकत्रित अहवालानंतर दोषी ८७ किरकोळ केरोसीन वितरकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे़
या नोटिसीनंतर समाधानकारक कारण नसल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे पुरवठा विभागातील सूत्रांकडून समजले़ त्यामुळे आता या प्रकरणी काय कारवाई होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़
अधिकाऱ्यांना अभय कायम
पुरवठा विभागाच्या वतीने एकाच बाजुने तपास केला जात आहे़ केरोसीन वितरणात काही वितरक दोषी असले तरी त्यांना अधिकचे केरोसीन वितरित करणाºया अधिकाºयांना मात्र जिल्हा प्रशासनाने मोकाट सोडले आहे़ नियमबाह्य केरोसीन वितरित केले नसते तर अनियमितताच झाली नसती़ त्यामुळे चुकीच्या पद्धतीने केरोसीन वितरित करणाºया वितरकांपेक्षा त्यांना नियतन मंजूर करणारे अधिकारी अधिक दोषी आहेत़ परंतु, अधिकाºयांना बाजुला करून फक्त वितरकांवरच कारवाई करण्याची मोहीम सध्या जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे़ त्यामुळे प्रशासनाच्या या एकतर्फी कारवाईबद्दल शंका उपस्थित केली जात आहे़
श्यामसुंदर सारडा यांचे उपोषण मागे
जिंतूरच्या अनियमित रॉकेल वितरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी २ आॅक्टोबरपासून बेमुदत उपोषणास बसलेले अर्धघाऊक केरोसीन वितरक श्यामसुंदर सारडा यांनी ८ आॅक्टोबर रोजी उपोषण मागे घेतले़ सोमवारी राज्याचे नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांचे विशेष कार्यकारी अधिकारी शेख यांनी दूरध्वनीवरून सारडा यांच्याशी चर्चा केली़ त्यात त्यांनी परभणी जिल्हा पुरवठा अधिकाºयांशी या प्रकरणी बोलणी झाली असून, त्यांच्या म्हणण्यानुसार ८७ किरकोळ परवानाधारकांवर कारवाई प्रस्तावित केली आहे़ डिलर व अधिकारी यांची चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़ आठ दिवसांत चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत सारडा यांना कळविले जाईल, त्यामुळे उपोषण मागे घेण्यात यावे, असे शेख यांनी सारडा यांना सांगितले़ त्यावरून सारडा यांनी आठ दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले आहे़