परभणी :२० कोटी रुपयांच्या विजेचा अतिरिक्त वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:33 AM2018-05-14T00:33:14+5:302018-05-14T00:33:14+5:30
उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे विजेची मागणी वाढते़ यावर्षी उन्हाची तीव्रता वाढली तशी विजेची मागणीही वाढली असून, तीन महिन्यांमध्ये तब्बल २० कोटी रुपयांची जास्तीची वीज परभणीकरांनी वापरली आहे़ त्यामुळे अतिरिक्त वीज पुरवठा करताना कंपनीच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली़
मारोती जुंबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे विजेची मागणी वाढते़ यावर्षी उन्हाची तीव्रता वाढली तशी विजेची मागणीही वाढली असून, तीन महिन्यांमध्ये तब्बल २० कोटी रुपयांची जास्तीची वीज परभणीकरांनी वापरली आहे़ त्यामुळे अतिरिक्त वीज पुरवठा करताना कंपनीच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली़
वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपकरणे वापरली जातात़ यात बहुतांश उपकरणे ही विजेवर चालणारी असल्याने विजेचा वापर वाढतो़ वीज वितरण कंपनीला दरवर्षीचा हा अनुभव आहे़ त्यामुळे उन्हाळा आला की कंपनीच्या वतीने भारनियमन केले जाते़
भारनियमनाला विरोध होत असला तरी विजेची वाढती मागणी आणि विजेचे उत्पादन यातील तफावत भरून काढण्यासाठी भारनियमन हा एकमेव पर्याय असल्याने महावितरण राज्यभरात भारनियमन करते़ हे भारनियमन करीत असताना ज्या काळात जास्तीत जास्त वीज वापरली जाते़ नेमकी त्याच काळात वीजपुरवठा बंद करून विजेचा अतिरिक्त वापर थांबविण्याचा प्रयत्न केला जातो़
यावर्षीही उन्हाळ्यामध्ये विजेची मागणी वाढत गेली़ परंतु, मागणी तसा पुरवठाही होत असल्याने महावितरण कंपनीने भारनियमन कमी केले़ विशेष करून शहरी भागात भारनियमन करण्याचे टाळले़ त्यातच उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी देता यावे, यासाठी राज्य शासनाने भारनियमन न करण्याचे आदेश दिल्यामुळे कृषी पंपासाठीही मोठ्या प्रमाणात विजेचा वापर झाला़
परभणी जिल्ह्याला वीज पुरवठा करताना महावितरण कंपनीला सर्वसाधारणपणे तीन महिन्यासाठी ९८ मिलियन युनिट (एमयुएस) वीज लागते़ उन्हाळ्यामध्ये ही मागणी वाढत जाते़ त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अधिकाºयांनी वाढती विजेची मागणी नोंदविली़ मागणी प्रमाणे पुरवठाही झाला आणि महावितरणला अधिकचा वीजपुरवठा करावा लागला़ मार्च महिन्यापासून खºया अर्थाने उन्हाळ्याची धग सुरू होते़ त्यामुळे उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घरोघरी कुलर्स, फॅनचा वापर वाढतो़ दिवसभर आणि रात्रीही कुलर्स आणि फॅनचा वापर होतो़ त्याचप्रमाणे पाणी पातळी घटत असल्याने विंधन विहिरीतून जास्तीत जास्त पाणी उपसा करण्यासाठी मोटारींचाही वापर शहरी भागात वाढला जातो़ यावर्षी जिल्ह्यात सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. जायकवाडी प्रकल्पाचे पाणी चार ते पाच वेळा सोडण्यात आले. त्यामुळे कालव्यातून पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत मोटारींचा वापर वाढला. पर्यायाने वीजेचा वापरही वाढला.
मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये ३६० मिलियन युनिटस् विजेचा वापर जिल्ह्यामध्ये झाला आहे़ उन्हाळ्यातील तीन महिन्यांच्या या काळात झालेला विजेचा वापर हा सर्वसाधारणपणे घरगुती वापरासाठी झाला आहे़
घरगुती वापरासाठी एका युनिटचा दर तीन रुपये एवढा आहे़ या वापरानुसार तीन महिन्यांत १९ कोटी ८० लाख रुपयांची अतिरिक्त वीज जिल्ह्याने वापरली आहे़ त्यामुळे उन्हाळ्यात अतिरिक्त विजेचा भारही जिल्ह्यातील महावितरणला सहन करावा लागला़
एजन्सींमुळे कंपनीला बसतो फटका
परभणी जिल्ह्यात वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे देयक त्यांना अदा करण्यासाठी महावितरण कंपनीने एजन्सीची नियुक्ती केल्या आहेत. या एजन्सी वीज ग्राहकांच्या मीटरचे रिडींग घेतात़ रिडींगप्रमाणे बिल तयार झाल्यानंतर हे बिल ग्राहकांना वाटप करण्याची जबाबदारी एजन्सींची आहे़ परंतु, जिल्ह्यात मात्र या प्रकरणात सावळा गोंधळ असल्याचे दिसून येते़ धड मीटर रिडींग व्यवस्थित घेतली जात नाही आणि घेतलेल्या मीटर रिडींगचे बिलही वेळच्या वेळी वितरित होत नाही़ त्यामुळे चुकीची बिले मिळाल्याची ओरड वीज ग्राहकांमधून कायम होत असते़ चुकीची आलेली बिले का अदा करायची? असाही प्रश्न निर्माण होतो आणि वीज बिल भरण्यासाठी टाळाटाळ केली जाते़ तसेच अनेक वेळा वीज बिल भरण्याची तारीख निघून गेल्यानंतर ग्राहकाच्या हाती देयक दिले जाते़ यातूनही महावितरणला नुकसान सहन करावे लागत आहे़ मागील अनेक दिवसांपासून असे प्रकार सुरू असताना महावितरण कंपनी मात्र ही प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी कोणतेही पावले उचलत नाही आणि ग्राहकांकडील थकबाकीचा आकडा प्रत्येक महिन्याला फुगत असल्याने कंपनीला नुकसान सहन करावे लागत आहे़
महिन्याकाठी २ कोटी युनिटचा वापर
महावितरण कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रति महिन्याला सर्वसाधारणपणे ९८ एमयूएस युनिट वीज जिल्ह्याला लागते़ ही एका महिन्यातील जिल्ह्याची सरासरी विजेची मागणी आहे़ परंतु, उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाल्यापासून विजेची मागणी वाढली़ प्रत्येक महिन्यामध्ये २२ मिलियन युनिटस् जास्तीची वीज लागली़ एका मिलियन युनिटमध्ये १० लाख युनिटचा समावेश असतो़ हा हिशोब करता महिन्याकाठी २ कोटी युनिट वीज जिल्ह्याने वापरली आहे़ तीन महिन्यांत ६ कोटी ६० लाख युनिट वीज जिल्ह्यासाठी वापरण्यात आली़ या अतिरिक्त युनिटचा प्रति युनिट ३ रुपये प्रमाणे हिशोब लावला तर १९ कोटी ८० लाख रुपयांची वीज जिल्ह्याने वापरली आहे़