परभणी :अतिरिक्त शिक्षकांचे ५ दिवसांत समायोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:50 AM2018-01-11T00:50:27+5:302018-01-11T00:50:32+5:30
जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त ठरलेल्या जिल्ह्यातील २२५ शिक्षक, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांचे समायोजन १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या अव्वर सचिवांनी जि़प़च्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत़ त्यामुळे येत्या ५ दिवसांत ही कठीण प्रक्रिया शिक्षण विभागाला पूर्ण करावी लागणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त ठरलेल्या जिल्ह्यातील २२५ शिक्षक, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांचे समायोजन १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या अव्वर सचिवांनी जि़प़च्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत़ त्यामुळे येत्या ५ दिवसांत ही कठीण प्रक्रिया शिक्षण विभागाला पूर्ण करावी लागणार आहे़
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ गेल्या वर्षभरापासून राज्य शासनाने चालविला आहे़ सातत्याने या प्रक्रियेत बदल केला गेला़ त्यामुळे अस्वस्थ शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविताना तारेवरची कसरत करावी लागली़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम झाला़ काही दिवसांपूर्वी राज्यातील शिक्षक संघटनांनी या संदर्भात मोर्चा काढल्यानंतर राज्य शासनाने बदल्यांची प्रक्रिया तूर्त थांबविली होती़ आता पुन्हा एकदा ही प्रक्रिया सुरू होणार आहे़
या पार्श्वभूमीवर ९ जानेवारी रोजी राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे अव्वर सचिव पी़एस़ कांबळे यांच्या स्वाक्षरीनिशी जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र पाठविण्यात आले आहे़ या पत्रात २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार संगणकीय पद्धतीने यावर्षी बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे़ यासाठी सर्व शिक्षकांचे शाळानिहाय मॅपिंग होणे आवश्यक आहे़
सध्या जिल्हा परिषद शाळांची संच मान्यता अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे़ शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शाळांना सरळ प्रणालीद्वारे आॅनलाईन पद्धतीने संच मान्यता पूर्ण करण्यासाठी आपल्या शाळेची व विद्यार्थ्यांची माहिती केंद्रप्रमुख व लॉगीनमधून फॉरवर्ड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ १६ जानेवारीपासून लगेचच जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू होणार असल्याने सदर कार्यवाही शाळा व केंद्रप्रमुखस्तरावर तातडीने दिलेल्या मुदतीत पूर्ण करणे गरजेचे आहे़
त्यामुळे याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरून संबंधितांना निर्देश देण्यात यावेत, जिल्हा अंतर्गत बदलीची प्रक्रिया ही मुदतीत व नियोजनबद्ध होणे आवश्यक असल्याने या प्रक्रियेत जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणाºया कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्यात यावी व १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी, असेही अव्वर सचिवांनी काढलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे़ त्यामुळे आता येत्या पाच दिवसांमध्ये जिल्हा परिषदेला शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे़ यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची धावपळ सुरू होणार आहे़
विशेष म्हणजे परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून ढेपाळला आहे़ दिवाळीपूर्वी शिक्षकांचे समानीकरण प्रक्रियेंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या अनियमिततेवरून चांगलाच गोंधळ उडाला होता़ यावेळी शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती़ यावरून शिक्षणाधिकारी आशा गरुड यांची चांगलीच गोची झाली होती़
या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा गरुड यांना जिल्ह्यातील २२५ शिक्षक, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांचे समायोजन पूर्ण करावे लागणार असल्याने या संपूर्ण प्रक्रियेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़
खाजगी शाळांमुळे विद्यार्थी संख्या घटली
शहरासह ग्रामीण भागामध्ये सध्या इंग्रजी शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ त्याचा जिल्हा परिषदेच्या शाळांवर परिणाम होत आहे़ कायम विनाअनुदानीत तत्त्वावर सुरू होणाºया इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याची जाहिरातबाजी करून खाजगी संस्थाचालक विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचत आहेत़ त्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा कमी पडत आहेत़ त्यामुळे जि़प़च्या अनेक शाळा बंद होण्याची वेळ आली आहे़ जिल्ह्यात १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १० शाळा बंद करण्यात आल्या असून, त्यामधील विद्यार्थी जवळच्या जि़प़ शाळेत किंवा खाजगी शाळांमध्ये वर्ग करण्यात आले आहेत़ त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांना आता शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करावे लागणार आहेत़ अन्यथा शिक्षक कपातीची कुºहाड कोसळू शकते़