परभणी : निवडणुकीसाठी प्रशासन खर्चणार पावणे नऊ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:37 AM2019-02-02T00:37:19+5:302019-02-02T00:37:57+5:30
एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतर होणाºया विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाकडून ८ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार असून यासाठी लागणाºया विविध कामांच्या निविदा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी काढल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतर होणाºया विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाकडून ८ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार असून यासाठी लागणाºया विविध कामांच्या निविदा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी काढल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ५ मार्चपर्यंत लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे राजकीय पक्षांची निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असताना प्रशासकीय पातळीवरुनही या संदर्भात युद्ध पातळीवर तयारी केली जात आहे. निवडणूक विभागाकडून एकीकडे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन संदर्भात जिल्हाभरात जनजागृती करण्यात आली. तर दुसरीकडे प्रशासकीय पातळीवरुनही अधिकाºयांच्या बैठका, कर्मचाºयांची माहिती मागविणे आदी कामे सुरु झाली आहेत. निवडणुकीसाठी लागणारे साहित्य मिळविण्याच्या दृष्टीकोनातून तयारी सुरु करण्यात आली आहे. या दृष्टीने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी २८ जानेवारी रोजी लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करीता विविध कामांच्या ८ कोटी ७० लाख रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामध्ये फर्निचर/ मंडप भाडे तत्वावर पुरवठा करणे यासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून तशी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. कर्मचारी- अधिकारी, चहापान, अल्पोहार व भोजन व्यवस्थेसाठी १ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. निवडणुकीत व्हिडिओग्राफी करणे, व्हिडिओ कॅमेरे, कॅमेरामनसह भाडे तत्वावर पुरवठा करणे यासाठीही १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. झेरॉक्स मशीन आणि झेरॉक्स प्रतिचा पुरवठा करणे यासाठी ५० लाखांची तर डीटीपी करणे व छपाई करणे यासाठीही ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. लेखन सामुग्री व तत्सम साहित्य पुरवठा करण्यासाठी १ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विविध प्रकारची वाहने भाडे तत्वावर पुरवठा करण्याकरीता ५० लाखांची तर हमाल व मजूर पुरविण्यासाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. सीसीटीव्ही व्हेब कॉस्टिंग व संगणक भाडे तत्वावर पुरवठा करण्यासाठी १ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यानुसार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत यासाठी संकेतस्थळावर निविदा भरता येणार आहेत. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता या निविदा उघडण्यात येणार आहेत. या निविदा संदर्भातील अटी व शर्ती या बाबतची माहिती महा टेंडर या प्रशासकीय संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
दरम्यान, लोकसभा आणि आॅक्टोबर महिन्यात होणाºया विधानसभा निवडणुकीसाठीच्या कामासाठी या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला वेगळ्या निविदा काढण्याची प्रशासनाला गरज लागणार नाही.
सर्व कार्यालय प्रमुखांची झाली बैठक
१ फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपविभागीय अधिकारी सूचिता शिंदे यांच्या उपस्थितीत शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील प्रमुखांची निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयाची माहिती तीन दिवसांत एनआयसीने विकसित केलेल्या सॉफ्टवेअर लिंकमध्ये भरावी, असे आदेश यावेळी उपजिल्हाधिकारी किरवले यांनी दिले. निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कार्य असल्याने वेळेत ते पूर्ण करणे सर्व अधिकाºयांना बंधनकारक आहे. त्यामुळे सर्वांनी आदेशाचे काटेकोर पालन करुन तातडीने आपल्या कार्यालयातील कर्मचाºयांची माहिती सॉफ्टवेअरमध्ये भरावी, असे किरवले म्हणाले.
१० हजार कर्मचारी लागणार
४परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण १ हजार ५०४ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच कर्मचाºयांची नियुक्ती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक विभागाला १० हजार कर्मचाºयांची आवश्यकता लागणार आहे. यासाठी शासनाच्या बहुतांश विभागातील कर्मचारी कामाकरीता घेण्यात येणार आहेत. कर्मचारी निवडीनंतर त्यांना प्रशासनाकडून निवडणुकी संदर्भात प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने अंतिम मतदार यादी गुरुवारी जाहीर केली आहे.