परभणी : राकाँच्या आंदोलनानंतर ८० टक्के तारण देण्यास प्रशासन तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:23 AM2019-09-19T00:23:47+5:302019-09-19T00:25:29+5:30
हमीभावाने मुगाची खरेदी होत नसल्याने बुधवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास कुलूप ठोकण्याच्या उद्देशाने आलेल्या राकाँ कार्यकर्त्यांना हमीदराच्या ८० टक्के शेतमालावर तारण देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहे. त्यामुळे मूग उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : हमीभावाने मुगाची खरेदी होत नसल्याने बुधवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास कुलूप ठोकण्याच्या उद्देशाने आलेल्या राकाँ कार्यकर्त्यांना हमीदराच्या ८० टक्के शेतमालावर तारण देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहे. त्यामुळे मूग उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
परभणी जिल्ह्यात मुगाचे पीक बाजारात विक्रीसाठी आले आहे. मात्र हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने जिल्ह्यात ४ ते ५ हजार रुपये प्रति क्विंटल दराने मुगाची खरेदी केली जात होती. या प्रश्नी राष्टÑवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांच्यासह इतरांनी जिल्हा उपनिबंधकांना निवेदन देऊन आधारभूत किमती प्रमाणे मुगाची खरेदी करावी अन्यथा हमीदराच्या ८० टक्के म्हणजे ५६४० रुपये दराने मुगावर तारण देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करुन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, या मागणीवर आतापर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्याने प्रा.किरण सोनटक्के, संतोष देशमुख, सुरेंद्र रोडगे, शांतीस्वरुप जाधव, सुमंत वाघ, रितेश काळे, सिद्धांत हाके, कृष्णा कटारे, प्रभू जाधव, मनोज राऊत, दीपक वारकरी आदी १८ सप्टेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल झाले.
कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी हमी दराच्या ८० टक्के दराने शेतमालावर तारण देण्याचे पत्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सचिवांच्या नावे काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी लूट थांबली आहे.