परभणी : आठ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना अत्याचारप्रकरणातील आरोपीला पकडण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:38 AM2018-11-11T00:38:20+5:302018-11-11T00:38:50+5:30
बोरी येथील बालिकेवरील अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी जिद्दीने तपास करुन आरोपीचा शोध लावला. आठवडाभरात अनेक मार्ग अवलंबत अखेर तपासाची दिशा निश्चित झाली आणि आरोपी गळाला लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : बोरी येथील बालिकेवरील अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी जिद्दीने तपास करुन आरोपीचा शोध लावला. आठवडाभरात अनेक मार्ग अवलंबत अखेर तपासाची दिशा निश्चित झाली आणि आरोपी गळाला लागला.
१ नोव्हेंबर रोजी बोरी येथे एका सहा वर्षीय बालिकेवर अत्याचाराची घटना घडली. या घटनेमुळे जिल्हाभरात संताप व्यक्त केला जात होता. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडे अनेक राजकीय पक्ष, समाजसेवी संस्थांनी पाठपुरावा केला. त्यामुळे पोलिसांची जबाबदारी वाढली होती.
या प्रकरणाचा तपास करीत असताना घटनास्थळावर कोणताच पुरावा हाती लागत नसल्याने पोलीसही हतबल झाले होते. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके स्थापन करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या अधिपत्याखालील पथकाने आरोपीची शोध मोहीम सुरु केली. मात्र पुरावा हाती लागत नसल्याने पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी इतर मार्गाचा अवलंब करावा लागला. त्यात बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संशयित ठिकाणे तपासण्यात आली. तसेच रेकॉर्डवरील गुन्ह्यांचीही माहिती जमा करण्यात आली. याच माहितीच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहचू शकले. आठवडाभरानंतर जिंतूर येथे पोलिसांना या प्रकरणातील आरोपी मिळून आला. परवेज खान रफीक खान पठाण (२२) यास मोटारसायकलसह पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर हा गुन्हा उघडकीस झाला. याकामी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, कापुरे, किशोर नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, शिवाजी देवकते, जमीर फारोखी, सय्यद मोईन, किशोर भूमकर, सय्यद मोबीन, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, मधुकर पवार, शेख ताजोद्दीन, विशाल वाघमारे, दिलावर पठाण, शंकर गायकवाड, अरुण कांबळे, शंकर हाके, संतोष सानप, माया पैठणे आदींनी प्रयत्न केले.