परभणी : क्रीडा संकुलनाचे काम ४ वर्षानंतरही होईना पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:24 AM2018-10-24T00:24:00+5:302018-10-24T00:24:43+5:30
ग्रामीण भागातील खेळाडुंना क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविण्यासाठी ‘तालुका तिथे क्रीडा संकुलन’ हे शासनाचे धोरण असताना सार्वजनिक बांधकाम व कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे पूर्णा येथील तालुकास्तरीय क्रीडा संकुलनाचे काम मागील चार वर्षापासून कासवगतीने सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): ग्रामीण भागातील खेळाडुंना क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविण्यासाठी ‘तालुका तिथे क्रीडा संकुलन’ हे शासनाचे धोरण असताना सार्वजनिक बांधकाम व कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे पूर्णा येथील तालुकास्तरीय क्रीडा संकुलनाचे काम मागील चार वर्षापासून कासवगतीने सुरू आहे.
शासनाच्या क्रीडा धोरणानुसार तालुकास्तरावरही क्रीडा संकुलने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१२ मध्ये नवीन क्रीडा धोरण अस्तित्वात आले. यामध्ये तालुकास्तरीय क्रीडा संकुले विशिष्ट कालमर्यादित पुर्ण करण्यावर भर देण्यात आला. या क्रीडा संकुलनासाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. निधी कमी पडत असल्याने या संकुलनासाठी वाढीव निधीची मागणीही करण्यात आली आहे. २०१४ साली पूर्णा येथील क्रीडा संकुलनाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. सद्य स्थितीत केवळ एका हॉल व्यतीरिक्त कोणतेही काम पूर्ण झाले नाही. दर तीन ते चार महिन्याला एकदा एखादे थातूरमातूर काम केले जाते. दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होईल, अशी क्रीडाप्रेमींची अपेक्षा होती;परंतु, चार वर्षे उलटले तरीही संकुलनाचे काम संथ गतीने सुरू आहे. वाढीव निधी मिळूनही संकुलनाचे काम अजूनही अपूर्ण आहे. क्रीडा संकुलाच्या पूर्ण कामात टेनिस हॉल, व्हॉलीबॉल मैदान, २०० मीटरची धावपट्टी, संरक्षक भिंत आदी कामांचा समावेश आहे. २०१४ ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत केवळ एकाच हॉलचे काम पूर्ण होत आहे. कधी झाडाझुडूपांची साफसफाई तर कधी पूर्ण झालेल्या हॉलला रंगरंगोटी करीत काम सुरू असल्याचा देखावा केला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या कामाच्या पूर्णत्वासाठी बांधकाम विभागाची चालढकल सुरू आहे. तर कंत्राटदारांच्या संथ कामामुळे क्रीडा संकुलनाच्या कामाला विलंब होत आहे. आठवडाभरापूर्वी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी कलिमोद्दीन यांनी पूर्णा येथील क्रीडा संकुलनाची पाहणी केली. त्यांच्या उपस्थितीत क्रीडा संकुलनाच्या संरक्षण भिंतीची सीमा आखून मार्कआऊट टाकण्यात आले. संरक्षण भिंत उभारणीच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात कधी होईल, याकडे क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे.
कंत्राटदारांच्या: उदासिन भूमिकेमुळे गैरसोय
सध्या तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत यश मिळविण्यासाठी खेळाडुंना सरावाची आवश्यकता असते. पूर्णा शहरासह तालुक्यातील खेळाडुंना क्रीडा संकुलनात सराव करता यावा, यासह पूर्णा तालुका क्रीडा कार्यालयाला तालुकास्तरीय वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करून खेळाडुंच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी २०१४ साली एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून क्रीडा संकुलनाच्या कामास मंजुरी देण्यात आली. प्रत्यक्ष काम सुरू होऊन चार वर्षे उलटले आहेत;परंतु, अद्याप खेळाडुंना सर्व सुविधायुक्त मैदान उपलब्ध झाले नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम, जिल्हा क्रीडा कार्यालय व कंत्राटदारांच्या उदासिन भूमिकेमुळे खेळाडुंना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
क्रीडा आयुक्तांच्या निर्देशाला खो
राज्याचे क्रीडा आयुक्त सुनिल केंद्रेकर हे परभणी दौऱ्यावर आले होते. तेव्हा तालुका क्रीडा अधिकारी व तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकाºयांची संयुक्त बैठक परभणी येथील क्रीडा संकुलनाच्या सभागृहात आयोजित केली होती. या बैठकीत जिंतूरसह अन्य तालुक्यातील क्रीडा संकुलनाचा प्रश्न महिनाभरात निकाली काढावा, असे निर्देश तालुका क्रीडा अधिकाºयांना क्रीडा आयुक्तांनी दिले होते;परंतु, क्रीडा आयुक्तांनी दिलेल्या निर्देशाला जवळपास वर्षभराचा कालावधी उलटला आहे;परंतु, पूर्णेसह बहुतांश तालुक्यातील क्रीडा संकुलनाचा प्रश्न अजूनही थंड बस्त्यातच असल्याचे पहावयास मिळत आहे.