परभणी : प्रत्येक फेरीनंतर असा बदलत गेला कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:42 AM2019-05-24T00:42:45+5:302019-05-24T00:42:58+5:30
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यावर मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे प्रत्येक फेरीनुसार मतदान केंद्राबाहेरील उपस्थित शिवसैनिक जल्लोष करताना दिसून आले.
परभणी : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यावर मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे प्रत्येक फेरीनुसार मतदान केंद्राबाहेरील उपस्थित शिवसैनिक जल्लोष करताना दिसून आले.
पहिल्या फेरीनंतर...
पहिल्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांना २३ हजार ८३३ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांना १७ हजार ३१ आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना ५ हजार ४८३ मते मिळाली.
दुसऱ्या फेरीनंतर...
दुसºया फेरीत शिवसेनेचे उमेदवार बंडू जाधव यांना ४५ हजार ८८४ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांना ३४ हजार ३९८ मते मिळाली होती. वंचित आघाडीचे आलमगीर खान यांना १० हजार २०५ मते मिळाली. या फेरीपासून वंचित आघाडीने राष्ट्रवादीच्या मतपेटीला सुरुंग लावण्यास प्रारंभ केला.
पाचव्या फेरीनंतर...
पाचव्या फेरीत शिवसेनेचे संजय जाधव यांना १ लाख १० हजार २ तर राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांना ८४ हजार ९३३ मते मिळाली. वंचित आघाडीचे आलमगीर खान यांना २८ हजार ९१९ मते मिळाली. या फेरीतही खा.जाधव यांची मताधिक्याची गाडी सुसाट राहिली.
दहाव्या फेरीनंतर...
दहाव्या फेरीत शिवसेनेचे संजय जाधव यांची आघाडी १७७ मतांनी कमी झाली. या फेरीत जाधव यांना २० हजार ३१५ तर विटेकर यांना २० हजार ४९२ मते मिळाली; परंतु, पूर्वीच्या आघाडीअंती जाधव यांना एकूण २ लाख १० हजार ३७५ तर विटेकर यांना १ लाख ८८ हजार ७१ मते मिळाली.त्यामुळे या फेरीअखेर जाधव यांची २२ हजार ३०४ मतांची आघाडी कायम राहिली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना या फेरीत ४ हजार ८२८ मते मिळाली. त्यांची एकूण मतांची बेरीज ५७ हजार ७६८ झाली.
पंधराव्या फेरीनंतर...
पंधराव्या फेरीत खा. संजय जाधव यांना १७ हजार ४९६ तर विटेकर यांना १९ हजार १३९ मते मिळाली. या फेरीत विटेकर यांना १ हजार ६४३ मतांची आघाडी मिळाली असली तरी जाधव यांच्याकडे यापूर्वीचे मताधिक्य असल्याने त्यांची एकूण ३ लाख ४ हजार ७१८ तर विटेकर यांची २ लाख ८७ हजार ९२३ मते झाली. त्यामुळे जाधव यांच्याकडे १६ हजार ७९५ मतांची आघाडी कायम राहिली.
विसाव्या फेरीनंतर...
२० व्या फेरीत शिवसेनेचे संजय जाधव यांना २३ हजार ५३१ तर राष्ट्रवादीचे विटेकर यांना १८ हजार ५३० मते मिळाली. या फेरीत जाधव यांनी विटेकर यांच्यावर ५००१ मतांची आघाडी घेतली. त्यामुळे जाधव यांना एकूण ४ लाख १२ हजार ६५६ तर विटेकर यांना ३ लाख ८७ हजार २७९ मते मिळाली. त्यामुळे जाधव यांच्याकडे २५ हजार ३७७ मतांची आघाडी कायम राहिली.
शेवटच्या फेरीनंतर...
शेवटच्या २९ व्या फेरीत शिवसेनेचे संजय जाधव यांना एकूण ५ लाख ३८ हजार २१४ तर राष्ट्रवादीचे विटेकर यांना ४ लाख ९६ हजार ३७२ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांना १ लाख ४९ हजार ८३४ मते मिळाली. या फेरीनंतर पोस्टल मते एकूण मतांमध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यामध्ये जाधव यांना ७२७ तर विटेकर यांना ३७० आणि खान यांना ११२ पोस्टल मते मिळाली. त्यामुळे या अखेरच्या फेरीअंती जाधव यांना एकूण ५ लाख ३८ हजार ९४१ तर विटेकर यांना ४ लाख ९६ हजार ७४२ आणि आलमगीर खान यांना १ लाख ४९ हजार ९४६ मते मिळाली. त्यामुळे शेवटच्या फेरी अखेर शिवसेनेचे संजय जाधव यांनी ४२ हजार १९९ अधिकची मते मिळवित राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा पराभव करुन दुसऱ्यांदा भारतीय संसदेत पोहण्याचा मान मिळविला.