परभणी : कृषी विद्यापीठास १६४ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:00 AM2019-03-28T00:00:52+5:302019-03-28T00:01:22+5:30
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संस्थांंतर्गत कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर बाबींसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशूसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने कृषी विद्यापीठाला १६४ कोटी ५५ लाख ८२ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास एका आदेशाद्वारे मंजुरी दिली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संस्थांंतर्गत कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर बाबींसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशूसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने कृषी विद्यापीठाला १६४ कोटी ५५ लाख ८२ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास एका आदेशाद्वारे मंजुरी दिली आहे़
राज्यातील चार कृषी विद्यापीठे आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत कृषीविषयक शिक्षण संशोधन या मुख्य हेडखाली पीकसंवर्धन, पशू संवर्धन, मत्स्य व्यवसाय, निवृत्ती वेतन विषयक खर्च, वेतनेत्तर सहाय्यक अनुदान आणि वेतनाचे सहाय्यक अनुदान यासाठी राज्य शासनाकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे़
२०१८-१९ या वर्षासाठी या निधीची तरतूद केली होती़ त्यापैकी काही निधी यापूर्वी वितरितही केला होता़ २५ मार्च रोजी शासनाने एक अध्यादेश काढून सुधारित अंदाजानुसार अनुदान वितरित करण्यास मंजुरी दिली आहे़ त्यामध्ये परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठालाही निधी वितरित करण्याची तरतूद करण्यात आली आहे़ शासनाच्या या निर्णयानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला पीक संवर्धन या मुख्य हेडखाली २ कोटी १६ लाख ५९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती़ तसेच याच योजनेंतर्गत १७३ कोटी ६ लाख १६ हजार रुपयांची तरतूद होती़ त्यामध्ये २५ मार्च रोजी जारी केलेल्या आदेशानुसार निवृत्ती वेतन विषयक खर्चासाठी ६० कोटी १५ लाख ९२ हजार, वेतनेत्तर सहाय्यक अनुदानासाठी ६ कोटी ८१ लाख ८४ हजार, वेतनाच्या सहाय्यक अनुदानासाठी ८१ कोटी असा १४७ कोटी ९७ लाख ७६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे़ याच हेडखाली वेतनेत्तर सहाय्यक अनुदानासाठी ७ लाख ४ हजार, वेतनाच्या सहाय्यक अनुदानासाठी १ कोटी ६० लाख असा १ कोटी ६७ लाख ४ हजार रुपयांचा निधी विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. तर सर्वसाधारण या लेखाशीर्षाअंतर्गत निवृत्ती वेतन विषयक खर्चासाठी ३ कोटी ४४ लाख ३ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.
सर्वसाधारण लेखाशीर्षामधील सुमारे १२० इतर संस्थांसाठी हा निधी असून, त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अंशदानाच्या रकमेइतकी समतूल्य अंशदानाची रक्कम देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे़ हा निधी मंंजूर झाल्याने विद्यापीठातील रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे़ दरवर्षी विद्यापीठासाठी ही तरतूद केली जाते़ त्यानुसार यावर्षाअखेरीस कृषी विद्यापीठाला निधीचे वितरण झाले आहे़
वेतनासह बांधकामांसाठीही अनुदान
राज्य शासनाने २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुधारित अंदाजानुसार वेतन, वेतनेत्तर अनुदान वितरित करण्यास मंजुरी दिली आहे़ त्याच प्रमाणे भांडवली मालमत्ता निर्मितीसाठीही अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे़ त्यामध्ये ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ त्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला वेतनेत्तर सहाय्यक अनुदानासाठी ९० लाख रुपयांचे मूळ अनुदान मंजूर होते़ तसेच भांडवली मालमत्तेच्या निर्मितीसाठी २ कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर आहे़ तर वेतनाच्या सहाय्यक अनुदानासाठी २ कोटी ३५ लाख रुपये मूळ अनुदान मंजूर आहे़ त्यामध्ये शासनाने सुधारित अंदाजानुसार वेतनेत्तर सहाय्यक अनुदानासाठी ७२ लाख रुपये वितरित केले आहे़ तर भांडवली मालमत्ता निर्मितीसाठी २ कोटी २० लाख आणि वेतनाच्या सहाय्यक अनुदानासाठी २ कोटी ६६ लाख ६ हजार रुपये निधी वितरणास मंजुरी दिली आहे़ तर पीकसंवर्धनासाठी वेतनेत्तर सहाय्यक अनुदान म्हणून ११ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे़ असा एकूण १६ कोटी ५८ लाख ६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़