परभणी : अहिल्याबाई होळकरनगरात घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:24 AM2019-12-24T00:24:48+5:302019-12-24T00:24:58+5:30
येथील एमआयडीसी भागातील अहिल्याबाई होळकर नगरातील एका घराला आग लागून किरायाने राहणाऱ्या पाच जणांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील एमआयडीसी भागातील अहिल्याबाई होळकर नगरातील एका घराला आग लागून किरायाने राहणाऱ्या पाच जणांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
एमआयडीसी भागातील अहिल्याबाई होळकरनगरमध्ये छायाबाई मुस्तागर यांचे निवासस्थान आहे. त्याला लागूनच मोकळ्या प्लॉटमध्ये टीन शेड व पार्टीशनच्या खोल्या किरायाने दिल्या आहेत.
सोमवारी या सर्व घरांना कुलूप होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या घराला अचानक आग लागली. घरातून आगीचे लोट बाहेर पडत असल्याने शेजारील नागरिकांनी अग्नीशमन दलाला घटनेची माहिती दिली. काही वेळातच अग्नीशमन दलाचा बंब दाखल झाला. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात अग्नीशमनच्या कर्मचाऱ्यांना यश आले. दरम्यान, या आगीमध्ये पाचही घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
या घटनेमुळे या सर्व कुटूंबियांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
सिलिंडर काढल्याने टळला अनर्थ
४आग लागलेल्या घरामध्ये सर्व किरायदारांकडे गॅस सिलिंडर होते. येथील नागरिकांनी तत्परता दाखवत या घरातील एक सिलेंडर बाहेर काढले तर अग्नीशमन दलाच्या कर्मचाºयांनी तीन सिलेंडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला
चार लाख रुपयांचे नुकसान
४दरम्यान, या प्रकरणी सचिन अशोक मुस्तागर यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
४अहिल्याबाई होळकर नगरात लागलेल्या आगीमध्ये जगदीश पांचाळ, विठ्ठल पांचाळ, श्याम कांबळे, राजाभाऊ कांबळे, भूजंग खंदारे यांच्या घरातील सोन्याचे दागिने, संसारोपयोगी साहित्य, टीव्ही, रेशनकार्ड, विमा कागदपत्रे आणि इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली़ त्यामध्ये जगदीश पांचाळ, राजाभाऊ कांबळे यांच्या घरातील रोख रक्कमही जळून खाक झाली आहे़
४या सर्व घटनेत सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सचिन मुस्तागर यांनी या तक्रारीत दिली असून, त्यावरून नवा मोंढा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे़