परभणी : जाळ्यात अडकलेल्या अजगरास जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:33 AM2018-12-22T00:33:45+5:302018-12-22T00:34:11+5:30
पूर्णा तालुक्यातील खडकी येथील नदीपात्रात मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या ७ फुटी लांबीच्या अजगराला परभणीतील सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पूर्णा तालुक्यातील खडकी येथील नदीपात्रात मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या ७ फुटी लांबीच्या अजगराला परभणीतील सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे.
खडकी नदीपत्रामाध्ये एका जाळ्यात अजगर अडकला असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी येथील शेतकरी गोपाळ पवार यांना मिळाली. त्यानंतर गावातील काही तरुणांनी काठीच्या सहाय्याने या अजगराला जाळ्यातून मुक्त करण्याचा प्रयत्नही केला; परंतु, त्यांना यश आले नाही. उलट तो अधिकच त्या जाळ्यात गुंतत गेला. निवृत्ती पवार, तुकाराम खुणे, हरिश पोपळघट यांनी ही माहिती परभणी येथील सर्पमित्र रणजित कारेगावकर यांना दिली. त्यानंतर २० डिसेंबर रोजी रणजित कारेगावकर यांच्यासह ज्ञानेश डाके, दीपक घाटूळ, प्रसाद ठाकूर हे वझूर येथे पोहोचले. तेव्हा नदीपात्रात अजगराच्या तोंडाचा पूर्ण भाग जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत होता. गावातून कात्री व ब्लेड मागविण्यात आल्या. ज्ञानेश डाके, रणजित कारेगावकर यांनी जाळे कापण्यास सुरुवात केली. दीपक घाटूळ व प्रसाद ठाकूर यांनी तडफडणाऱ्या अजगरास पकडून ठेवले. एक तासाच्या प्रयत्नानंतर या अजगराला जाळ्यातून मुक्त करण्यात यश आले. पकडलेला अजगर निर्जनस्थळी सोडून देण्यात आला. याकामी विकास पवार, शिवाजी पवार, बालासाहेब पवार, दिलीप पवार, देवानंद कचरे, माणिक पवार, नानासाहेब पवार, सूर्यकांत पवार, शरद अंभुरे आदींनी सहकार्य केले.