परभणी : सव्वा कोटी खूर्चनही ९१४ शौचालयांची कामे अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:35 AM2019-07-27T00:35:23+5:302019-07-27T00:36:09+5:30
येथील पंचायत समिती अंतर्गत स्वच्छ भारत मिशन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील २६ गावांमध्ये २ हजार ५९० लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी ५ हजार रुपये या प्रमाणे १ कोटी २९ लाख रुपये ठेकेदारामार्फत देऊनही ९१४ शौचालयांची कामे अपूर्णच असल्याची बाब समोर आली आहे.
सत्यशील धबडगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत: येथील पंचायत समिती अंतर्गत स्वच्छ भारत मिशन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील २६ गावांमध्ये २ हजार ५९० लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी ५ हजार रुपये या प्रमाणे १ कोटी २९ लाख रुपये ठेकेदारामार्फत देऊनही ९१४ शौचालयांची कामे अपूर्णच असल्याची बाब समोर आली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा जिल्ह्यात बोजवारा उडाल्याची बाब सातत्याने समोर येत आहे. मानवत तालुक्यात प्रशासनातील कर्मचाऱ्यांनीच या योजनेचा बट्ट्याबोळ केला आहे. तालुक्यातील २६ गावांतील २ हजार ५९० लाभार्थ्यांची या योजनेसाठी निवड करण्यात आली होती. प्रत्येक लाभार्थ्याला १२ हजार रुपयांप्रमाणे अनुदान मंजूर झाले होते. हे पूर्ण अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करणे अपेक्षित होते; परंतु, पंचायत समितीचे शौचालय बांधकाम साहित्य खरेदीच्या नावाखाली २ हजार २०० लाभार्थ्यांचे १ कोटी १० लाख रुपये थेट कंत्राटदाराला वितरित केले. यामध्ये रामपुरी बु. येथील २५८ लाभार्थ्यांना शौचालयाचे साहित्य वाटप झाले. त्याबदल्यात १४ लाख २५ हजार रुपये ठेकेदार मुकेश ट्रेडर्स यांना १२ मे २०१७ व १९ मार्च २०१९ रोजी अदा केले आहेत. असे असतानाही २८५ पैकी २२५ शौचालयांचीच कामे पूर्ण झाली असून ६० शौचालयांची कामे अपूर्ण आहेत.
टाकळी निलवर्ण येथील १०५ शौचालयांपैकी ७३ ची कामे पूर्ण झाली असून ३२ ची कामे अपूर्ण आहेत. सोमठाणा येथील ५० पैकी १० शौचालयांची कामे अपूर्ण आहेत. रुढी येथील १०९ पैकी ९ लाभार्थ्यांची कामे अपूर्ण आहेत. मंगरुळ येथील १४२ पैकी ३७, पार्डी येथील ३५ पैकी २०, किन्होळा येथील १०० पैकी ४७, आंबेगाव येथील ५० पैकी ९, देवलगाव आवचार येथील ९६ पैकी १२, सारंगापूर येथील ५० पैकी २३, हमदापूर येथील १०० पैकी ३८, इरळद येथील ५५ पैकी २, पाळोदी येथील ९० पैकी ४०, गोगलगाव येथील ५० पैकी २८, उक्कलगाव येथील ५० पैकी १२, ताडबोरगाव येथील २५ बैकी ६, वांगी येथील ४०पैकी १२, वझूर खु. येथील ३० पैकी १३, सोनुळा येथील ३० पैकी २९, सावंगी मगर येथील ८६ पैकी ४०, केकरजवळा येथील १९७ पैकी ५५, रामेटाकळी येथील २०० पैकी ७५, करंजी येथील ११८ पैकी ४४, कोथाळा येथील १५२ पैकी ९३, कोल्हा येथील १०० पैकी ३०, पोहंडूळ येथील ७० पैक १४ वैयक्तिक शौचालयांची कामे अपूर्ण आहेत. असे असतानाही सदरील साहित्याची रक्कम कंत्राटदाराच्या घशात पं.स.ने घातली आहे.
अधिकाऱ्यांवरील कारवाईकडे दुर्लक्ष
४या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वरिष्ठ अधिकाºयांना धारेवर धरण्यात आले. त्यानंतर पुन्हा चौकशी समिती नेमल्याने योजनेत थेट ठेकेदाराला रक्कम दिल्याची बाब बाहेर आली. या संपूर्ण प्रकारामुळे पंचायत समितीचा ढिसाळ कारभार उघड झाला असला तरी या विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांवर कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे यापूर्वी पूर्णा तालुक्यातील एका कंत्राटदाराच्या खात्यावर तत्कालीन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी या संदर्भातील रक्कम जमा केल्यानंतर मोठा गजब झाला होता.
४हे प्रकरण थेट अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर खोडवेकर यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. तसेच त्यांची बदलीही झाली होती. या प्रकरणात मात्र वरिष्ठ अधिकाºयांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणाला वाचवले जात आहे, असा सवाल केला जात आहे.
जिल्हा परिषदेची नाचक्की
४स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय उभारणीच्या कामात सातत्याने अनिमितता होत असल्याची बाब समोर येत आहे. काही वर्षापूर्वी पूर्णा तालुक्यातील कंत्राटदाराच्या खात्यावर रक्कम जमा केल्याचा प्रकार समोर आल्यानंतरही पुन्हा मानवतमध्ये तोच प्रकार घडला आहे.
४परभणी पंचायत समितीमध्येही चक्क पं.स.च्या अधिकाºयांनीच रेडिमेड शौचालय आणून लाभार्थ्यांना देण्याचा गोरख धंदा काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या प्रकरणात चौकशी झाली; परंतु, त्यावरील कारवाईचा अहवाल गुलदस्त्यात ठेवण्यात आला. विशेष म्हणजे या विभागाचे अधिकारी प्रसारमाध्यमांपासून दूर राहत असल्याचे पहावयास मिळत आहे. परिणामी सातत्याने जिल्हा परिषदेची नाचक्की होत आहे.