परभणी : आतापर्यंतचे सर्वच अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 10:57 PM2020-03-27T22:57:58+5:302020-03-27T22:58:21+5:30

जिल्ह्यात तब्बल १६ दिवसांपासून कोरोनाच्या अनुषंगाने संशयितांच्या तपासण्या केल्या जात आहेत. त्यात आतापर्यंत १३४ जणांची तपासणी केल्यानंतरही एकही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळलेला नाही. त्यामुळे जिल्हावासियांनी आणखी काही दिवस शासनाने घालून दिलेल्या नियमांची तंतोतंत अंमलबजावणी केल्यास कोरोनावर निश्चितच मात केली जाऊ शकते, असेच आतापर्यंतच्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे.

Parbhani: All reports so far are negative | परभणी : आतापर्यंतचे सर्वच अहवाल निगेटीव्ह

परभणी : आतापर्यंतचे सर्वच अहवाल निगेटीव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात तब्बल १६ दिवसांपासून कोरोनाच्या अनुषंगाने संशयितांच्या तपासण्या केल्या जात आहेत. त्यात आतापर्यंत १३४ जणांची तपासणी केल्यानंतरही एकही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळलेला नाही. त्यामुळे जिल्हावासियांनी आणखी काही दिवस शासनाने घालून दिलेल्या नियमांची तंतोतंत अंमलबजावणी केल्यास कोरोनावर निश्चितच मात केली जाऊ शकते, असेच आतापर्यंतच्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे.
जिल्ह्यात १२ मार्चपासून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. १२ मार्चपासून जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिक उपस्थिती बंद करण्यात आली. तसेच जिल्ह्यात दुबईहून परतलेल्या पाच जणांचे स्वॅब घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेत याच दिवशी पाठविण्यात आले. नंतर या सर्वांचे स्वॅब निगेटीव्ह आले. त्यापुढील काळातही जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या निर्देशाचे पालन करीत विविध उपाययोजना अंमलात आणल्या. १६ मार्चपासून राज्यभरात लॉकडाऊन सुरु झाला. त्यानंतर केंद्र सरकारने २३ मार्चपासून देशभरात संचारबंदी लागू केली आहे. या दरम्यानच्या काळात आतापर्यंत जिल्ह्यातील १३४ कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८५ जणांचे स्वॅब घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी ६२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ८ जणांच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे. प्रयोगशाळेने १५ जणांचे अहवाल तपासण्याची आवश्यता नाही म्हणून रिजेक्ट केले आहेत. या १३४ जणांपैकी ५६ नागरिक परदेशातून आले असून त्यांच्या संपर्कात ५ व्यक्ती आल्या आहेत. जिल्ह्यातील १३४ संशयितांपैकी ११० जणांना होम क्वॉरनटाईन करण्यात आले असून १२ जणांवर दवाखान्यातच संसर्गजन्य कक्षातच निगराणीत ठेवण्यात आले आहे. उर्वरित १२ जणांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. २७ मार्च रोजी ४ नवीन संशयित व्यक्तीचे स्वॅब घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यात गेल्या १६ दिवसांत एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेला नाही, ही सर्वात जमेची बाब आहे. त्यामुळे यापुढील कालावधीतही शासनाच्या निर्देशाचे पालन केल्यास जिल्हावासीय कोरोनावर निश्चित मात करु शकतात.
खाजगी दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश -जिल्हाधिकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश संबंधितांना दोन दिवसांपूर्वीच देण्यात आले असून याची अंमलबजावणी न करणाºया डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिला आहे.
जिल्ह्यात खाजगी दवाखाने बंद असल्याने नियमित उपचारासाठी येणाºया रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याच्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र दिले आहे. त्यांना ओपीडी बंद करता येणार नाही. तसेच त्यांना दवाखाने सुरु ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
नियमित रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यांना वेळेत योग्य तो उपचार मिळाला पाहिजे. त्यामुळे डॉक्टरांनीही संवेदनशिलता बाळगून आपले दवाखाने सुरु ठेवले पाहिजेत. शासनाच्या आदेशाचे पालन न करणाºया डॉक्टरांवर कारवाई करणार, असा इशाराही मुगळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
आयएमएच्या सर्व सदस्यांचे दवाखाने सुरुच- राजू सुरवसे
४इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य असलेल्या जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांचे दवाखाने सुरु आहेत. महाराष्ट्र मेडीकल कौन्सीलने टेलिफोनिक कन्सल्टंटला मंजुरी दिली आहे़ त्यानुसार ५० टक्के रुग्णांना या माध्यमातून सेवा देण्यात येत आहे. शिवाय अन्य सदस्यांचीही सेवा सुरुच आहे. इतर संघटनांच्या दवाखान्यासंदर्भात काय स्थिती आहे, या संदर्भात, आपण बोलणे योग्य राहणार नाही. प्रशासनाने प्रत्येक गाव/ शहरातील एकूण दवाखान्यांची संख्या व चालू आणि बंद असलेल्या दवाखान्यांची माहिती घेतल्यास सत्यस्थिती बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ.राजू सुरवसे यांनी दिली.
सेलू शहरात बंद केलेले दवाखाने सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आल्याने शहरातील काही खाजगी दवाखाने बंद ठेवले होते. या संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचा आदेश आल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे यांनी संबंधित डॉक्टरांशी चर्चा केली. त्यामुळे गुरुवारी बंद असलेले खाजगी दवाखाने शुक्रवारी उघडण्यात आले.
कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे. या परिस्थितीत सेलू शहरातील काही खाजगी डॉक्टरांनी आपली ओपीडी सुरु ठेवली आहे. तर काही डॉक्टरांनी मात्र ओपीडी बंद ठेवली आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. मधुमेह, हृदयविकार, बालरोग तज्ज्ञ, स्त्री रोग, आयुर्वेदिक, जनरल फिजिशियन, होमियोपॅथिक, दंत विकार, कान, नाक, घसा तज्ज्ञ, नेत्रविकार तज्ज्ञ आदींकडे तपासणीसाठी येणारे रुग्ण बंद झाले होते. त्यामुळे हे रुग्ण हवालदिल झाले होते. या संदर्भात जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्याकडे काही रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे यांना या संदर्भात कारवाई करण्याची सूचना दिली. त्यानंतर डॉ.हरबडे यांनी संबंधित डॉक्टरांशी चर्चा करुन त्यांना याबाबत माहिती दिली व शासनाच्या नियमाचे उल्लंघन करता येणार नाही, असे केले तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. त्यानंतर गुरुवारी बंद असलेले खाजगी दवाखाने शुक्रवारी उघडण्यात आल्याचे दिसून आले.
शहरातील काही खाजगी दवाखाने लॉकडाऊननंतर बंद असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. विशेषत: हृदयरोग, मधुमेह, नेत्ररोग, अस्थीरोग तज्ज्ञ आदी दवाखाने सुरु नव्हते. आपद्कालीन स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार गुरुवारी शहरातील सर्व खाजगी दवाखाने सुरु करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शुक्रवारी अनेक खाजगी दवाखाने उघडण्यात आली. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाºयांना पाठविणार आहे.
-डॉ.संजय हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, सेलू

Web Title: Parbhani: All reports so far are negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.