परभणी : रस्त्याची दैना कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:19 AM2019-06-13T00:19:54+5:302019-06-13T00:20:01+5:30
गंगाखेड रस्त्याची दुरवस्था अजूनही कायम असून, या रस्त्यावरील खड्डे वाहनधारकांना अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत़ त्यामुळे मागील काही वर्षांपासून गंगाखेड रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : गंगाखेड रस्त्याची दुरवस्था अजूनही कायम असून, या रस्त्यावरील खड्डे वाहनधारकांना अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत़ त्यामुळे मागील काही वर्षांपासून गंगाखेड रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे़
परभणी ते गंगाखेड या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न राज्यभर गाजल्यानंतर रस्त्याच्या निर्मितीसाठी शासनाने २०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला़ हा निधी मंजूर झाल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले़ असे असले तरी या रस्त्यावरील खड्डे अजूनही वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत़ गंगाखेड येथून खळीपाटीपर्यंत या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत़ रस्त्याच्या मध्यभागी मोठे खड्डे असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ रात्रीच्या वेळी तर हा त्रास अधिकच वाढतो़ त्यामुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ या रस्त्यावरील असंख्य खड्डे चुकविण्याच्या नादात दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत़ आगामी काळात पावसाळा सुरू होत असून, पाऊस पडल्यानंतर या खड्ड्यांत पाणी साचून हे खड्डे वाहनधारकांना लक्षात येत नाहीत़ परिणामी अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे़ यापूर्वीही दुचाकी व चारचाकी वाहनांना गंभीर स्वरुपाचे अपघात झाल्याची घटना या रस्त्यावर खडली आहे़ या अपघातात वाहनधारक जखमी झाल्याचेही प्रकार घडले आहेत़ तेव्हा रस्त्याच्या कामाबरोबरच या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राधान्य द्यावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे़
चौपदरी रस्ता होणार
च्गंगाखेड ते परभणी या रस्त्याला नुकताच राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे़ विशेष म्हणजे, या रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे़ पूर्वीचा दुपदरी असलेला रस्ता आता चारपदरी होणार असल्याने वाहनधारकांची समस्या मिटणार आहे़
च्रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे़ गंगाखेड तालुक्यातील खळी पाटीपासून ते पोखर्णी फाटा आणि त्या पुढे ताडपांगरीपर्यंत हा रस्ता खोदून नव्याने रस्ता निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे़
च्विशेष म्हणजे, नवीन रस्त्याचे काम करताना एका बाजुचा रस्ता खोदला असून, दुसऱ्या बाजुने वाहतूक सुरू आहे़ त्यामुळे वाहनांसाठी धोका वाढला आहे़ काही महिन्यांपूर्वी खोदलेल्या खड्ड्यात ट्रॅव्हल्स कोसळल्याची घटना घडली होती़ या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, याची काळजी घ्यावी़
चार वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था
गंगाखेड ते परभणी हा राज्य महामार्ग आहे़ त्याला आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असला तरी सद्यस्थितीला रस्त्याची दुरवस्था कायम आहे़ गंगाखेड ते खळी पाटी या दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे आहेत़ त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे वाहनधारकांसाठी दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे़ विशेष म्हणजे, रस्ता खराब असल्याने अनेकांनी परभणी ते गंगाखेड हा प्रवास रेल्वेच्या सहाय्यानेच करणे पसंत केले आहे़ सध्या रस्त्याचे काम सुरू असले तरी यापूर्वी रस्त्यावर असलेले खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले आहे़ बांधकाम विभागाने हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे़