परभणीत अंगणवाडी सेविका, मदतनिसांचे जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 03:44 PM2019-02-08T15:44:26+5:302019-02-08T15:48:53+5:30
केंद्र सरकारच्या २० सप्टेंबर २०१८ च्या मानधनवाढीच्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी
परभणी- अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतनश्रेणी व भत्ते देण्यात यावेत, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या वतीने परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या २० सप्टेंबर २०१८ च्या मानधनवाढीच्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी, केरळ, दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश, तेलंगणा आदी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जेवढे मानधन मिळते, तेवढे मानधन महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना द्यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभात तिपटीने वाढ करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते देण्यात यावेत आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरगंड यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना प्रदेशाध्यक्ष देशमुख, जिल्हाध्यक्ष आवरगंड आदींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी जेलभरो आंदोलन केले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पहा व्हिडिओ :