परभणी : प्रारुप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:21 AM2020-02-19T00:21:56+5:302020-02-19T00:22:56+5:30
जिल्हा बँकेच्या प्रारुप मतदार यादीचा अंतीम कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने जाहीर केला आहे़ त्यानुसार १३ एप्रिल रोजी जिल्हा बँकेची अंतीम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा बँकेच्या प्रारुप मतदार यादीचा अंतीम कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने जाहीर केला आहे़ त्यानुसार १३ एप्रिल रोजी जिल्हा बँकेची अंतीम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे़
औरंगाबाद खंडपीठाने जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेवरील स्थगिती उठविण्याचे आदेश दिल्यानंतर या संदर्भातील प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे़ जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सभासद संस्थांचे ठराव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या सुचनेनुसार ३१ जानेवारीपर्यंत मागविण्यात आले होते; परंतु, या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती़ ती स्थगिती न्यायालयाच्या आदेशाने उठविल्यानंतर थांबलेल्या संस्था सभासद प्रतिनिधीचा ठराव मागणीसाठी २० ते २७ फेब्रुवारी असा सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे़ २८ फेब्रुवारी रोजी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी प्राप्त संस्था प्रतिनिधीचे ठराव जिल्हा बँकेस द्यायचे आहेत़ त्यानंतर बँकेने प्रारुप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी यांना ५ मार्च रोजी सादर करावयाची आहे़ १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी ही प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणार आहेत़ या यादीवर २६ मार्च पर्यंत आक्षेप स्वीकारले जाणार आहेत़ ७ एप्रिल रोजी आक्षेपांवर निर्णय दिला जाणार आहे़ त्यानंतर १३ एप्रिल रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव यशवंत गिरी यांनी यासंदर्भात १८ फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे़