परभणी : दहावी, बारावी परीक्षेसाठी चुकीच्या पद्धतीने पर्यवेक्षकांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:53 AM2019-02-17T00:53:34+5:302019-02-17T00:53:40+5:30
दहावी आणि बारावी परीक्षेसाठी जिल्हा दक्षता समितीने चुकीच्या पद्धतीने पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असून एका तालुक्यातील शिक्षकास तालुका सोडून दूर अंतरावरील शाळेत पर्यवेक्षकाची नियुक्ती दिल्याने संताप व्यक्त होत आहे. याविरुद्ध १८ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे समन्वयक माजी आ.विजय गव्हाणे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दहावी आणि बारावी परीक्षेसाठी जिल्हा दक्षता समितीने चुकीच्या पद्धतीने पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असून एका तालुक्यातील शिक्षकास तालुका सोडून दूर अंतरावरील शाळेत पर्यवेक्षकाची नियुक्ती दिल्याने संताप व्यक्त होत आहे. याविरुद्ध १८ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे समन्वयक माजी आ.विजय गव्हाणे यांनी दिली.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा दक्षता समितीने पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्या करताना शिक्षक, मुख्याध्यापकांसह संस्थाचालकांवर अविश्वास दाखविण्यात आला. परभणी तालुक्यातील शाळांमधील सर्वच शिक्षकांना दुसऱ्या तालुक्यातील दूर अंतरावरील शाळेत पर्यवेक्षणाची जबाबदारी दिली आहे. तसेच शिक्षण संस्थेमधील सर्वच्या सर्व शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती दिली. त्यामुळे परीक्षेच्या काळामध्ये शाळा चालवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शैक्षणिक कामकाज ठप्प होणार आहे. याशिवाय महिला शिक्षकांना पर्यवेक्षणासाठी जाणे जिकिरीचे होणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेणेही शक्य होणार नाही. याविरुद्ध १८ फेब्रुवारी रोजी शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक तीव्र धरणे आंदोलन करणार आहेत. तसेच सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर येतील, असेही माजी आ. गव्हाणे यांनी सांगितले. या प्रश्नी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनावर उदय देशमुख, बळवंत खळीकर, रामकिशन रौंदळे, प्रा.अरुणकुमार लेमाडे, प्रा. विजय घोडके, निसार पटेल, डी.सी.डुकरे, शेख सगीर, महेश पाटील, गजानन जुंबडे, नंदकिशोर साळवे, सुभाष चव्हाण, मुजाहेद अली, पठाण रहीम खान, मा.मा. सुर्वे, ए.यु. कुलकर्णी, अनंत पांडे, गणेश शिंदे आदींची नावे आहेत.
४बारावी परीक्षेचे पर्यवेक्षणाचे कार्य मूळ आस्थापनावर द्यावे, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने केली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थी हे इतर महाविद्यालयातील असतात. तसेच पर्यवेक्षणाचे कार्य संपल्याबरोबर उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे कार्य करावे लागते. हे काम वेळेवर झाले नाही तर निकाल वेळेवर लागणार नाहीत. शिवाय तालुक्यांतील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. ही बाब लक्षात घेता राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे परभणी जिल्ह्यातही मूळ आस्थापनेवर नियुक्ती द्यावी, अशी मागणी जुक्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय घोडके, सरचिटणीस अरुणकुमार लेमाडे आदींनी केली आहे.