परभणी : १४ लाखांच्या प्रस्तावांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:17 AM2018-03-20T00:17:29+5:302018-03-20T00:17:29+5:30
जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केली असून, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी १४ लाख ६८ हजार ६७८ रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे़ यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केली असून, विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी १४ लाख ६८ हजार ६७८ रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे़ यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे़
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासूनच टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे़ अनेक गावांमध्ये पाणीसाठे आटल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ आगामी काळात टंचाईची ही परिस्थिती आणखीच गंभीर होण्याची शक्यता आहे़ पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यापासूनच आराखडा तयार केला आहे़
आॅक्टोबर ते जून या सात महिन्यांच्या काळात पाणीटंचाईच्या निवारणासाठी २९ कोटी ४३ लाख ६४ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला़ या आराखड्यात अनेक कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत़ मार्च महिन्यापर्यंत या आराखड्यानुसार कामे करण्याची वेळ आली नसली तरी सध्या मात्र टंचाई परिस्थिती उद्भवत आहे़ त्यामुळे प्रशासनाने पाणीटंचाईच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे़
जिल्ह्यात सद्यस्थितीला आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, त्याच जोडीला विंधन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांनाही सुरुवात केली जाणार आहे़
जिल्हा प्रशासनाने ७४ गावांमधील विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तींना मंजुरी दिली असून, त्यासाठी १४ लाख ६७ हजार ६७८ रुपयांचा निधीही प्रस्तावित केला आहे़ पाणीटंचाईच्या निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून जिल्हा प्रशासनाला ९३ प्रस्ताव प्राप्त झाले होते़ या प्रस्तावानुसार भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून अहवाल मागविण्यात आला़ या अहवालानुसार जिंतूर, पूर्णा, गंगाखेड आणि मानवत या चार तालुक्यांमधील ७४ विंधन विहिरींच्या दुरूस्तीच्या कामाला जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ग्रामीण भागातील नादुरुस्त विंधन विहिरींची दुरुस्तीची कामे सुरू होवून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होणार आहे़