परभणी : ४९ लाखांच्या कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:20 AM2019-01-30T00:20:00+5:302019-01-30T00:20:33+5:30
ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ४९ लाख २१ हजार ८२१ रुपयांच्या टंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे़ यामध्ये २३ गावांत नळ योजनांच्या दुरुस्तीची कामे होणार असून, १६ गावांमध्ये नव्याने विंधन विहीर घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ४९ लाख २१ हजार ८२१ रुपयांच्या टंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे़ यामध्ये २३ गावांत नळ योजनांच्या दुरुस्तीची कामे होणार असून, १६ गावांमध्ये नव्याने विंधन विहीर घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे़
यावर्षी जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे़ संपूर्ण जिल्ह्यालाच पाणीटंचाईने वेढले आहे़ त्यामुळे यावर्षी प्रथमच आॅक्टोबर महिन्यात टंचाई निवारणाचे कृती आराखडे तयार करण्यात आले़ तालुकास्तरावर पंचायत समितीमार्फत हे आराखडे तयार झाले असून, त्यात संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये करावयाच्या उपाययोजनांचा समावेश आहे़ प्रकल्पांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, भूजल पातळीतही लक्षणीय घट झाल्याने प्रशासनाला पाणीटंचाई निवारणासाठी कामे हाती घ्यावी लागत आहेत़ या संदर्भात जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेकडून आराखडे मागविले़ टंचाईग्रस्त गावांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी वेगवेगळ्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे़ त्यात २३ गावांमध्ये नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची कामे होणार आहेत़
सेलू तालुक्यामधील दहा गावांमध्ये नळ योजनांच्या दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे़ विशेष दुरुस्तीची कामे विहित कालावधीत पूर्ण केल्यास त्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल, या उद्देशाने ही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़ सेलू तालुक्यातील भिमणगाव येथे १ लाख ५० हजार २१९ रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून, पिंपळगाव गोसावी येथे १ लाख ७५ हजार, रायपूर २ लाख ४ हजार ४००, कोलदंडी व तांडा १ लाख ७३ हजार ८२०, राव्हा १ लाख ७९ हजार ३००, सावंगी पीसी १ लाख ७६ हजार ३३५, कुंडी १ लाख ३५ हजार ५५०, पिंपराळा १ लाख ७९ हजार ९००, गिरगाव बु़ १ लाख ५९ हजार आणि उगळी धामणगाव येथील नळ योजनेच्या दुरुस्तीसाठी २ लाख ९४ हजार ८०० रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़
तसेच मानवत तालुक्यामध्ये १३ गावांत नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची कामे होणार आहेत़ तालुक्यातील ताडबोरगाव १ लाख ४२ हजार १०१, देवलगाव आवचार १ लाख ८२ हजार ६००, मानवत रोड १ लाख ९२ हजार ५००, रत्नापूर २ लाख ७२ हजार ९००, इटाळी २ लाख ३९ हजार ९००, राजुरा ९० हजार ९५०, कोल्हा १ लाख ४२ हजार ४००, आंबेगाव १ लाख ९ हजार २७०, कोथाळा १ लाख ६२ हजार ६५०, सावंगी मगर १ लाख ३८ हजार ८६०, मंगरुळ पालम पट १ लाख ३८ हजार, नरळद १ लाख २८ हजार १५० आणि टाकळी नीलवर्ण येथील दुरुस्तीच्या कामासाठी २ लाख १४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत़
जिल्ह्यातील १६ गावांमध्ये खोदणार विंधन विहीर
ग्रामीण भागात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी नव्याने विंधन विहीर घेतली जाणार आहे़ परभणी व गंगाखेड या दोन तालुक्यातील विंधन विहिरीच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे़ परभणी तालुक्यातील कारला येथे विंधन विहिरीसाठी ६७ हजार २५६ रुपयांना मंजुरी दिली असून, उर्वरित पंधराही गावांमध्ये ५८ हजार १९६ रुपये विंधन विहिरींसाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यात परभणी तालुक्यातील ठोळा, इस्माईलपूर, कौडगाव, जोड परळी, जवळा, दामपुरी, गंगाखेड तालुक्यातील गौळवाडी, उंबरवाडी तांडा, करलेवाडी, उंबरवाडी, सुपा जहांगीर, कांगणेवाडी, धारखेड, बेलवाडी आणि अरबूजवाडी या गावांचा समावेश आहे़ १६ विंधन विहिरींसाठी प्रशासनाने ९ लाख ४० हजार १९६ रुपयांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे़
आॅक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली असली तरी प्रशासनाकडून उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती़ टंचाई निवारणाची कामे सुरू नसल्याने ग्रामस्थांमधून ओरड वाढत चालली होती़ जिल्हा प्रशासनाने आता टंचाई निवारणाच्या कामांना मंजुरी दिल्याने या कामांची गती वाढेल, पर्यायाने पाणीटंचाई शिथिल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़