परभणी : सहा महिन्यांत साडेतीन कोटींच्या कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:23 AM2019-07-01T00:23:17+5:302019-07-01T00:24:23+5:30
उन्हाळ्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३ कोटी ५१ लाख ७५ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असून यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. तर काही भागात अजूनही टंचाई निवारणाची कामे सुरु आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : उन्हाळ्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३ कोटी ५१ लाख ७५ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असून यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. तर काही भागात अजूनही टंचाई निवारणाची कामे सुरु आहेत.
यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात उपाययोजना हाती घ्याव्या लागल्या. सहा महिन्यांमध्ये तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देऊन प्रशासनाने टंचाईची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
मागील वर्षीच्या पावसाळ्यात परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच जिल्हा प्रशासनाला पाणीटंचाईचे नियोजन करावे लागले. मागील दहा वर्षात प्रथमच यावर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. या गावांना पाणीपुरवठा करताना प्रशासनातील अधिकाऱ्यांना धावपळ करावी लागली.
पावसाळ्याला सुरुवात झाला असला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने काही भागांमध्ये टंचाईची परिस्थिती कायम आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजनांच्या माध्यमातून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यामध्ये नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची ८७ कामे हाती घेतली असून या कामांसाठी १ कोटी ७८ लाख ३९ हजार रुपयांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. याशिवाय तात्पुरत्या नळ योजना दुरुस्तीची २२ कामे मंजूर करण्यात आली असून १ कोटी ४ लाख ७३ हजार रुपये या कामांवर खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अनेक भागामध्ये उपलब्ध विहिरींना पाणी नसल्याने नवीन विहीर घेऊन त्या भागातील पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न झाला. सहा महिन्यांच्या काळात ११८ नव्या विहिरींना मंजुरी दिली आहे. ६८ लाख ६३ हजार रुपयांची ही कामे आहेत. प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांपैकी अनेक कामे पूर्ण झाली आहेत. काही शिल्लक आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाली असून ही कामे तातडीने पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने यावर्षी प्रथमच ९ महिन्यांचा टंचाई आराखडा तयार केला होता. त्यात सर्वसाधारणपणे ४२ कोटी रुपयांच्या कामांची तरतूद केली होती. त्यापैकी साडेतीन कोटी रुपयांच्या कामांना प्रत्यक्ष प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. याशिवाय टँकर, विहीर अधिग्रहण यावर जिल्हा प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी पाणीटंचाईवर दुप्पटीपेक्षा अधिक खर्च झाल्याने जिल्हा प्रशासनाला टंचाईकाळात मोठ्या प्रमाणावर धावपळ करावी लागली. मंजुरी दिलेली कामे तातडीने पूर्ण करुन टंचाईग्रस्त गावात पाण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे.
सेलू : तालुक्यात सर्वाधिक निधीची कामे
४टंचाई निवारणाच्या कामात सेलू तालुक्यामध्ये सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी सेलू तालुक्यामध्ये ४० लाख ४० हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. परभणी तालुक्यात ३४ लाख ७४ हजार, जिंतूर तालुक्यात २१ लाख ६० हजार, मानवत तालुक्यात २१ लाख ५३ हजार, गंगाखेड तालुक्यात १७ लाख, पाथरी तालुक्यात १७ लाख ३३ हजार, पालम १४ लाख ८६ हजार, पूर्णा ७ लाख २८ हजार आणि सोनपेठ तालुक्यामध्ये ३ लाख ५९ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
४तसेच तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या कामांनाही काही तालुक्यात प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यात गंगाखेड तालुक्यात ४३ लाख ९ हजार रुपयांची १० कामे मंजूर करण्यात आली आहेत. पूर्णा तालुक्यात ३४ लाख ३३ हजार, पालम १९ लाख ४१ हजार, सोनपेठ ४ लाख ९१ हजार आणि परभणी तालुक्यामध्ये २ लाख ९९ हजार रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
१०९ टँकरने पाणीपुरवठा
४जिल्ह्यातील पाणीटंचाई यावर्षी अधिकच गंभीर झाल्याने टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवावी लागली. १०९ टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात पालम तालुक्यात सर्वाधिक २३ टँकर सुरु आहेत.
४गंगाखेड आणि सेलू तालुक्यात प्रत्येकी १६, जिंतूर तालुक्यात १९, पूर्णा तालुक्यात १६, परभणी व सोनपेठ तालुक्यात प्रत्येकी ५, मानवत तालुक्यात ७ आणि जिंतूर तालुक्यात २ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे.
४ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त असलेल्या १०५ गावांमधील १ लाख ७४ हजार ६७६ ग्रामस्थांना टँकरच्या पाण्याने दिलासा दिला आहे.
तीन टँकर कमी
४जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे तीन गावांमधील पाणीटंचाई कमी झाली आहे.
४ परिणामी जिल्हा प्रशासनाने पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी, जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे आणि पाचलेगाव या तीन गावांमधील टँकर कमी केले आहेत. उर्वरित १०६ टँकरच्या सहाय्याने अजूनही पाणीपुरवठा केला जात आहे.