परभणी: तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:49 AM2019-07-20T00:49:34+5:302019-07-20T00:49:57+5:30
परभणी तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी केला; परंतु, त्यात त्यांना यश न आल्याने शेजारीच असलेल्या एका मेडिकलमध्ये प्रवेश करुन जवळपास ४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेडगाव (परभणी) : परभणी तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी केला; परंतु, त्यात त्यांना यश न आल्याने शेजारीच असलेल्या एका मेडिकलमध्ये प्रवेश करुन जवळपास ४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
पेडगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. या बँक शाखेत गुरुवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून आत प्रवेश केला. त्यानंतर बँकेतील कपाटे फोडली. त्यात काहीही हाती न लागल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा तिजोरीकडे वळवला; परंतु, तिजोरी फोडता न आल्याने चोरटे तेथून निघून गेले. बँकेच्या शेजारीच असलेल्या सिद्धीविनायक स्टोअरचे शटर वाकवून चोरट्यांनी त्यात प्रवेश केला. मेडिकलच्या गल्ल्यात असलेले ४ हजार रुपये लंपास केले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पुंगळे यांच्यासह बीट जमादार युसूफ पठाण घटनास्थळी दाखल झाले. रवि देशमुख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिते करीत आहेत.