परभणी : लाभार्थ्यांच्या तांदळावरही डल्ला मारण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:13 AM2020-04-19T00:13:47+5:302020-04-19T00:14:16+5:30
कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या निराधार आणि गरजवंत लाभार्थ्यांची उपासमार टाळण्यासाठी प्राप्त झालेल्या तांदळातून लाभार्थ्यांच्या हिश्श्यात डल्ला मारण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे संकट काळातही लाभार्थ्यांना हक्काच्या तांदळासाठी झगडावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या निराधार आणि गरजवंत लाभार्थ्यांची उपासमार टाळण्यासाठी प्राप्त झालेल्या तांदळातून लाभार्थ्यांच्या हिश्श्यात डल्ला मारण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे संकट काळातही लाभार्थ्यांना हक्काच्या तांदळासाठी झगडावे लागत आहे.
परभणी जिल्ह्यात २३ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे. हाताला काम नसल्याने रोजचा दिवस कसा काढावा, असा प्रश्न या नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. गोरगरीब लाभार्थ्यांची अन्नधान्याविना उपासमार होऊ नये, या उद्देशाने राज्य शासनाने लाभार्थ्यांसाठी नियमित रेशनचा पुरवठा सुरु केला. त्यामध्ये गहू, तांदूळ व इतर धान्य पुरवठा केले जाते. याशिवाय केंद्र शासनाने गरीब कल्याण योजना सुरु केली असून या अंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रति सदस्य पाच किलो तांदूळ तीन महिन्यांपर्यंत मोफत दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्याला सुमारे ६ हजार क्विंटल तांदळाचा पुरवठा करण्यात आला आहे. रेशन दुकानदाराने प्राप्त झालेल्या तांदळापैकी ५ हजार क्विंटल तांदूळ उचल केला आहे. त्यामुळे या महिन्यातील प्रत्येक लाभार्थी सदस्याला ५ किलो तांदूळ मिळणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यात १३ एप्रिलपासून तांदूळ वितरणास प्रारंभ झाला आहे. हे तांदूळ वितरित करीत असताना लाभार्थ्याच्या तक्रारी मात्र वाढल्या आहेत. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी आ.बाबाजानी दुर्राणी यांनीही या अनुषंगाने तक्रार केली होती. एका रेशन कार्डावर किमान ५ सदस्यांची नावे असतात. प्रति सदस्य ५ किलो या प्रमाणे एका कुटुंबामध्ये किमान २५ किलो तांदूळ मिळणे अपेक्षित आहे. कुटुंबियांना एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदूळ प्राप्त होत असल्याने काही दुकानदार या तांदळातही आपला हिस्सा उचलत आहेत. सदस्यांना त्यांच्या हक्काचा पूर्ण तांदूळ मिळविण्यासाठीही झगडावे लागत आहे. या संदर्भात अनेक लाभार्थी, स्वयंसेवी संस्थांनीही तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे आता पुरवठा विभाग काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
कारवाईनंतरही प्रकार सुरूच
४लाभार्थी सदस्यांना कमी प्रमाणात तांदूळ मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आ.बाबाजानी दुर्राणी यांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पाथरी तालुक्यातील एका रेशन दुकानाचा परवाना निलंबित करण्याची तर सेलू तालुक्यातील एका रेशन दुकानदाराची अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई केली होती. या दोन कारवाया केल्यानंतरही लाभार्थ्यांच्या तक्रारी सुरुच आहेत. त्यामुळे या मोठ्या संकटात लाभार्थ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी त्यांच्या हक्कातच वाटा उचलला जात असून प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
तीन महिने मिळणार मोफत तांदूळ
४कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल ते जून या कालावधीसाठी प्रति महा ५ किलो तांदूळ मोफत वितरित करण्याचे आदेश आहेत. यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. प्रत्येक लाभार्थी सदस्याला तीन महिने पाच किलो मोफत तांदूळ वितरित करण्याचे निर्देश आहेत. विशेष म्हणजे या निर्देशांचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. योजनेंतर्गत एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे नियतन जाहीर झाले असून त्या अंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये एकूण ४३ हजार ६५५ कार्डधारक आणि त्या कार्डावरील १ लाख ८८ हजार १९७ सदस्य पाच किलो तांदूळ मिळविण्यासाठी पात्र आहेत. या सदस्यांसाठी ९४१ मेट्रिक टन नियतन मंजूर करण्यात आले आहे.
बायोमेट्रिक बंद झाल्याने वाढल्या तक्रारी
स्वस्तधान्य दुकानावर अन्नधान्य प्राप्त करण्यासाठी ई-पॉस मशीनच्या सहाय्याने ते वितरित केले जात होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक लाभार्थ्याचा बायोमेट्रिक न घेता रेशन दुकानदारानेच बायोमेट्रिक करुन लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे धान्य वितरणात कमी धान्य मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे या योजनेची पुरेशी जनजागृती झाली नाही. रेशन दुकानदार दुकान सुरु ठेवत नाहीत, अशाही तक्रारी आहेत.