परभणी : जुन्या कार्यकर्त्यांमध्ये जागविल्या निष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:08 AM2019-03-28T00:08:03+5:302019-03-28T00:08:40+5:30
परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून आतापर्यंत दुर्लक्षित केलेल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठा जागविल्या जात असून, प्रचाराच्या रणधुमाळीत योगदान देण्यासाठी त्यांना साकडे घातले जात आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून आतापर्यंत दुर्लक्षित केलेल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठा जागविल्या जात असून, प्रचाराच्या रणधुमाळीत योगदान देण्यासाठी त्यांना साकडे घातले जात आहे़
परभणी लोकसभा मतदार संघात यावेळेस चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे़ शिवसेना-भाजपाकडून खा़ संजय जाधव दुसऱ्यांदा मैदानात उतरले असून, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून जि़प़चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर निवडणूक लढवित आहेत़ या शिवाय वंचित बहुजन आघाडीकडून आलमगीर खान तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून कॉ़ राजन क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत़ अन्यही उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज परत घेण्याचा २९ मार्च हा शेवटचा दिवस आहे़ त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात अंतीम उमेदवारांची निश्चिती होणार आहे़ असे असले तरी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित असल्याने त्यांच्यातच तूल्यबळ लढती होणार असल्याची चर्चा सुरू आहे़ या प्रमुख उमेदवारांकडून आता जुन्या कार्यकर्त्यांचा शोध घेतला जात आहे़ शिवाय त्यांच्याशी संपर्क साधून दुभंगलेली मने जुळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे़ आतापर्यंत दुर्लक्षित राहिेलेल्या या कार्यकर्त्यांमध्ये पक्षनिष्ठा जागविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जात आहे़ त्यामध्ये काही ठिकाणी यश येत आहे़ तर काही ठिकाणी वरवरचा होकार देऊन प्रचारात सहभागी होत असल्याचा आव कार्यकर्ते व नेत्यांमधून आणला जात आहे़ त्यामुळे निष्ठा जागविलेले जुने कार्यकर्ते खरेच प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत की नाही? याची पडताळणी मतदानानंतर मतदान यंत्र उघडल्यानंतरच समोर येणार आहे़
सद्यस्थितीत मात्र स्वपक्षीय नाराजांची मनधरणी करून त्यांना प्रचाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याची कसरत उमेदवार व समर्थकांमधून केली जात आहे़ स्वकीयांबरोबरच इतर पक्षामध्ये असलेले मैत्रीचे संबंधही उजागर करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून निवडणूक निमित्ताने सुरू आहे़
स्टार प्रचारकांची जिल्ह्याला प्रतीक्षा
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याकरीता ४० स्टार प्रचारकांची नियुक्ती केली आहे़ त्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राजेश टोपे, फौजिया खान आदींचा समावेश आहे़ २६ मार्च रोजी झालेल्या पक्षाच्या जाहीर सभेत स्वत: अध्यक्ष पवार, प्रदेशाध्यक्ष पाटील, टोपे, फौजिया खान यांची उपस्थिती होती़ स्टार प्रचारकांच्या यादीमधील अजित पवार, छगन भुजबळ, सुषमा अंधारे, शब्बीर विद्रोही, डॉ़ अमोल कोल्हे, चित्रा वाघ आदी दिग्गज वक्ते परभणीत आलेले नाहीत़ त्यामुळे त्यांची मतदारांना प्रतीक्षा आहे़ शिवसेनेने २० स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली आहेत़ त्यामधील एकही स्टार प्रचारक अद्याप परभणी मतदार संघात आलेला नाही़ त्यामुळे शिवसेनेचे स्टार प्रचारक तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खा़ संजय राऊत, दिवाकर रावते, आदेश बांदेकर, पालकमंत्री गुलाबराव पाटील, नीलम गोºहे आदी स्टार प्रचारकांची मतदारांना प्रतीक्षा लागली आहे़ या दोन प्रमुख उमेदवारां व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड़ प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे प्रमुख खा़ असदोद्दीन ओवीसी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, काँग्रेसचे स्टार प्रचारक तथा प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात, राजीव सातव, भालचंद्र मुणगेकर, हरिभाऊ राठोड आदींचीही मतदारांना प्रतीक्षा आहे़ तसेच भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी दिग्गज नेत्यांचीही जिल्हावासियांना प्रतीक्षा आहे़