परभणी : वर्चस्वासाठी महाआघाडीमध्ये चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:31 PM2019-12-28T23:31:48+5:302019-12-28T23:36:48+5:30

पूर्वीच्या प्रशासकाची मुदत संपल्यानंतर जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर नवीन प्रशासकाची नेमणूक करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्ररित्या प्रशासक मंडळाची शिफारस पणन मंत्र्यांकडे केली आहे़ त्यामुळे आता कोणत्या गटाचे प्रशासक मंडळ स्थापन होणार? याची उत्सुकता लागली असून, जिंतूरमध्ये महाआघाडीच्या पक्षातच चढाओढ असल्याचे दिसत आहे़

Parbhani: The battle for supremacy | परभणी : वर्चस्वासाठी महाआघाडीमध्ये चढाओढ

परभणी : वर्चस्वासाठी महाआघाडीमध्ये चढाओढ

Next


विजय चोरडिया ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): पूर्वीच्या प्रशासकाची मुदत संपल्यानंतर जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर नवीन प्रशासकाची नेमणूक करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्ररित्या प्रशासक मंडळाची शिफारस पणन मंत्र्यांकडे केली आहे़ त्यामुळे आता कोणत्या गटाचे प्रशासक मंडळ स्थापन होणार? याची उत्सुकता लागली असून, जिंतूरमध्ये महाआघाडीच्या पक्षातच चढाओढ असल्याचे दिसत आहे़
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २१ फेब्रुवारी २०१५ या वर्षापासून सभापतीपद रिक्त आहे़ प्रत्येकवेळी राजकीय मंडळींची मुख्य प्रशासकपदी नियुक्ती केली जाते़ भाजपच्या कार्यकाळात मुख्य प्रशासक म्हणून खंडेराव आघाव यांनी कार्यभार पाहिला.़ पहिले अडीच वर्षे ते मुख्य प्रशासक होते़ त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी त्यांचे स्वतंत्र प्रशासक मंडळ बाजार समितीवर बसविले होते़ यात कृष्णा देशमुख यांची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली़ या प्रशासकाची मुदत ६ डिसेंबर २०१९ रोजी संपली आहे़ आता राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने बाजार समितीवर कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता लागली आहे़
दरम्यानच्या काळात तत्कालीन मुख्य प्रशासक खंडेराव आघाव यांनी आपली सत्ता यावी यासाठी हिंगोलीचे शिवसेनेचे आ़संतोष बांगर यांच्यामार्फत पणन मंत्र्यांना पत्र देवून मुख्य प्रशासकपदी खंडेराव आघाव तर सदस्य म्हणून श्रीनिवास शर्मा, कुबेर हुलगुंडे, गणेश घुले, मो़ मजहर, गणेश शिवलिंगआप्पा, अंबादास मोरे, उद्धव मुळे, अंबादास भांबळे, मांगीलाल राठोड, मुरली मते यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली़
संतोष बांगर यांच्या पत्रामुळे पणन महासंघाच्या उपसंचालक ज्योती शंकपाल यांनी जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठवून संबंधित मुख्य प्रशासक व सदस्यांची माहिती शासनाकडे पाठविण्याचे आदेश दिले़ याच दरम्यान, खंडेराव आघाव यांचे नाव पुढे येत असल्याची कुणकुण राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना लागली़ त्यांनी तातडीने कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागावी म्हणून माजी आ़ विजय भांबळे यांच्यामार्फत राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांना पत्र पाठविले आहे़ त्यात बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी मनोज थिटे यांची तर सदस्य म्हणून जगदीश शेंद्रे, शंकर जाधव, रुपेश चिद्रवार, म़ अबेत, हनुमंत भालेराव, कैलास सांगळे, दिलीप डोईफोडे, प्रभाकर चव्हाण, दिलीप घनसावंत, प्रकाश शेळके यांच्या नावांची यादी दिली आहे़ तसेच बोरी बाजार समितीवर मुख्य प्रशासक म्हणून विजय खिस्ते तर सदस्य म्हणून रामेश्वर जावळे, दशरथ बकान, शेख रफिक, रवि देशमुख, शरद अंबोरे, विठ्ठल मुटकुळे, शशिकांत चौधरी, बाळासाहेब मगर, प्रकाश सानप, मनोज देशमुख यांची नियुक्ती करावी, असे पत्र पणन मंत्री जयंत पाटील यांच्याकडे दिले आहे़
जयंत पाटील यांनी या दोन्ही पत्रांवरून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश पणन सचिवांना दिले आहेत़ त्यामुळे माजी आ़ विजय भांबळे यांनी सूचविलेले प्रशासक मंडळ दोन्ही बाजार समित्यांवर नियुक्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़
या संदर्भात काँग्रेस मात्र अद्यापही चिडीचूप असल्याचे दिसते़ दरम्यान, राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिघांचे एकत्रित प्रशासक मंडळाची शक्यता आहे़; परंतु, ज्या पक्षाचा पणन मंत्री असेल त्याच पक्षाचा मुख्य प्रशासक बनेल, अशी शक्यता आहे़
धोरणात्मक निर्णयावर निवडणूक अवलंबून
४कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्यासाठी भाजप सरकारने सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार प्रदान केला होता़
४आता हे सरकार बदलले असून, महाविकास आघाडीचे सरकार पूर्वीचा निर्णय बदलते की जुन्या निर्णयानुसार निवडणुका घेते यावरही या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे़
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात असून, निवडणुकीसाठी लागणारा निधी उपलब्ध झाला की तातडीने निवडणूक घेण्यात येईल़
-ए़एस़ गुसिंगे, सहाय्यक निबंधक, जिंतूर

Web Title: Parbhani: The battle for supremacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.