परभणी : वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे तालुक्यात वाळूमाफिया निर्ढावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:11 AM2019-05-12T00:11:22+5:302019-05-12T00:11:58+5:30
तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात असलेल्या वाळू धक्क्यावरील वाळूच्या व्यवसायात राजकीय व्यक्तींंचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढल्याने तालुक्यातील वाळूमाफिया निर्ढावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात असलेल्या वाळू धक्क्यावरील वाळूच्या व्यवसायात राजकीय व्यक्तींंचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढल्याने तालुक्यातील वाळूमाफिया निर्ढावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून तालुक्याच्या प्रारंभापासून तर शेवटपर्यंत मैराळ सावंगी, गौंडगाव, चिंचटाकळी, खळी, आनंदवाडी, महातपुरी, दुस्सलगाव, भांबरवाडी, धारखेड, गंगाखेड शहर, झोला, पिंपरी व मसला इ. गावांत १३ ठिकाणी असलेल्या वाळू धक्यांपैकी चालू वर्षात केवळ चिंचटाकळी व दुस्सलगाव या गावातील दोनच वाळू धक्क्यांचा लिलाव महसूल प्रशासनाने केला आहे. उर्वरित सर्वच धक्क्यावरून मात्र विनापरवाना अवैधरीत्या बेसुमार वाळूचा उपसा सुरू असल्याचे दिसत आहे. दरदिवशी अवैध वाळू उपशामुळे वाळूमाफियांमध्ये या-ना त्या कारणावरून वाद होऊन हाणामारीच्या घटना घडत आहेत. अशाच एका घटनेत कुºहाडीसाख्या धारदार शस्त्राने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वाळू भरून घेऊन जाणारी काही वाहने अडवा-अडवीची घटना घडल्याने ग्रामस्थ व वाळू धक्काचालकामध्ये चांगलाच वाद झाला होता. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. यामध्ये राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांंनी व लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्याने वाढत गेलेल्या वादात पोलीस निरीक्षकासमोरच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला होता. काही वेळाने हा वाद निवळला. मात्र पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांसमोरच वाद होऊनही पोलिसांनी कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे वाळू व्यवसायाच्या स्पर्धेतून भविष्यात या वाळूमाफियांमध्ये गँगवारसारखे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता तालुक्यातील नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी गोदावरी नदीपात्रातून होत असलेल्या बेसुमार वाळू उपशाला लगाम घालावा, अशी मागणी होत आहे.
गौंडगावची वाळू साळापुरी मार्गे परभणीला
तालुक्यातील गौंडगाव, मैराळसावंगी येथून अनधिकृतरीत्या वाळू उपसा केला जात आहे. गौंडगाव येथून दिवसा ट्रॅक्टरने वाळू उपसा करून ब्रह्मनाथ,धारासूर शिवेवर असलेल्या गायरान जमिनीवर वाळूचा साठा करून या साठ्यातील वाळू पहाटे व रात्रीच्या वेळी हायवा वाहनाद्वारे ब्रह्मनाथ, साळापुरी मार्गे परभणी व इतर ठिकाणी हलविला जात आहे. तर झोला, पिंपरी शिवारातून उपसा होत असलेली वाळू अहमदपूर, किनगावकडे हलविली जात आहे. बेसुमार वाळू उपशामुळे गोदावरी नदीपात्राचे वाळवंट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्राबरोबर नदीकाठच्या गावातील पाणीपातळी खालावल्याचे दिसून येत आहे.