परभणी : घरकुल लाभार्थ्यांना मिळाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:27 PM2019-04-22T23:27:07+5:302019-04-22T23:30:51+5:30
पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्याने ठप्प झाले होते़ मात्र तालुक्यातील वाळू धक्के सुरू झाल्याने कमी दरात वाळू उपलब्ध होत असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़ घरकुलांची कामे आता पूर्ववत सुरू झाले असून, नव्याने घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनीही कामे सुरू केली आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्याने ठप्प झाले होते़ मात्र तालुक्यातील वाळू धक्के सुरू झाल्याने कमी दरात वाळू उपलब्ध होत असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़ घरकुलांची कामे आता पूर्ववत सुरू झाले असून, नव्याने घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनीही कामे सुरू केली आहेत़
केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजनेंतर्गत तालुक्यासह शहरातील लाभार्थ्यांना घरकुले मंजूर केली़ त्यासाठीची पंचायत समिती प्रशासनाने प्रक्रिया पूर्ण करून संबंधित लाभार्थ्यांना पैसाही उपलब्ध करून दिला; परंतु, घरकुलाची ही बांधकामे करण्यासाठी लाभार्थ्यांकडे वाळू उपलब्ध होत नव्हती़ तालुक्यातील एकाही वाळू धक्क्याचा लिलाव झाला नव्हता़ त्यातच बाजारातील वाळू विकत घ्यायची असेल तर ३ ब्राससाठी जवळपास २० हजार रुपये मोजावे लागत होते़ त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना बाजारातील वाळू विकत घेऊन घरकुलाची उभारणी करणे अशक्य होते़ त्यामुळे मानवत शहरातील लाभार्थ्यांनी पंचायत समिती, तहसील प्रशासनाची भेट घेऊन घरकुलाच्या बांधकामासाठी शासकीय भावात वाळू उपलब्ध करून द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला़ परंतु, लाभार्थ्यांना वेळेवर वाळू काही मिळाली नाही़ परिणामी पंतप्रधान आवास व रमाई घरकुल योजनेतील मंजूर झालेली घरकुलांची कामे ठप्प पडली होती़
रमाई घरकुल योजनेंतर्गत मानवत शहरातील आंबेडकर नगर, बुद्धनगर यासह विविध ठिकाणी लाभार्थ्यांची घरकुलांची कामे सुरू आहेत़ बांधकाम अर्ध्यापर्यंत आल्यानंतर वाळूची आवश्यकता भासू लागली़ मात्र लिलावाची प्रक्रिया सुरू नसल्याने वाळूची टंचाई निर्माण झाली होती़
अवैधरीत्या साठून ठेवणाºया वाळूची अव्वाच्या सव्वा दराने विक्री सुरू केल्याने गोरगरीब लाभार्थ्यांना या दराने वाळू घेणे परवडत नव्हते़ तालुक्यातील वांगी आणि कुंभारी येथील वाळू धक्क्याचा लिलाव झाल्याने मुबलक वाळू उपलब्ध होत आहे़
सद्यस्थितीत ३ ब्रास वाळूसाठी १२ हजार रुपये किंमत मोजावी लागत आहे. पूर्वीपेक्षा वाळूचे भाव कमी झाल्याने लाभार्थी वाळूची मागणी करीत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे़
१०२ घरकुलांची कामे सुरू
४मानवत नगरपालिकेंतर्गत रमाई घरकुल योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ६८ घरकुले मंजूर झाली होती. त्यापैकी ३४ घरकुलांची कामे सुरू आहेत़ तर दुसºया टप्प्यात १०५ घरकुलांना मंजुरी असून, ६८ घरकुलांची कामे सुरू असल्याची माहिती नगरपालिकेने दिली़ सुरुवातीला ३ ब्रास वाळू २० हजार रुपये अशा सोन्याच्या भावाने गोरगरीब लाभार्थ्यांना घ्यावी लागली़ यामुळे आर्थिक फटका बसला आहे़ सरते शेवटी तालुक्यातील वाळू धक्के सुटल्याने भाव उतरले असून, रमाई घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़