परभणी : श्री साईबाबांचे जन्मस्थळ ही आमची अस्मिता : ग्रामसभेत मान्यवरांचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:19 AM2020-01-22T00:19:25+5:302020-01-22T00:20:11+5:30
श्री साईबाबा यांचे जन्मस्थळ ही आमची अस्मिता असून, तो तमाम साईभक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे़ त्यामुळे या संदर्भात कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही़ श्री सार्इंच्या जन्मस्थळ विकास आराखड्यासाठीच निधी द्या, असा सूर मंगळवारी पाथरी येथील ग्रामसभेत उमटला़ यावेळी जिल्हाभरातील भाविक उपस्थित होते़
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : श्री साईबाबा यांचे जन्मस्थळ ही आमची अस्मिता असून, तो तमाम साईभक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे़ त्यामुळे या संदर्भात कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही़ श्री सार्इंच्या जन्मस्थळ विकास आराखड्यासाठीच निधी द्या, असा सूर मंगळवारी पाथरी येथील ग्रामसभेत उमटला़ यावेळी जिल्हाभरातील भाविक उपस्थित होते़
श्री साईबाबांच्या पाथरी येथील जन्मस्थळ विकास आराखड्यास शिर्डीकरांनी विरोध दर्शविला आहे़ या अनुषंगाने सोमवारी शिर्डीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली़ त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पाथरीला तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा भाग म्हणून निधी देणार असल्याचे सांगितले़ पाथरीकरांना ही भूमिका मान्य नाही़ या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मंगळवारी पाथरी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते़ श्री सार्इंच्या महाआरतीनंतर झालेल्या ग्रामसभेस संस्थाचे अध्यक्ष सीताराम धानू, विश्वस्त संजय भुसारी, अॅड़ अतुल चौधरी, खा़ संजय जाधव, आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ डॉ़ राहुल पाटील, आ़ सुरेश वरपूडकर, माजी आ़ मोहन फड, माजी आ़ माणिकराव आंबेगावकर, माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, जि़प़ सभापती मीराताई टेंगसे, माजी नगराध्यक्ष मुंजाजी भाले पाटील, माजी जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते, बाजार समिती सभापती अनिल नखाते, माजी जि़प़सभापती दादासाहेब टेंगसे, सुभाष कोल्हे, उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, उपनगराध्यक्ष हन्नान खान दुर्राणी, नगरसेवक राजीव पामे, माणिकआप्पा घुंबरे आदींची उपस्थिती होती़यावेळी बोलताना संस्थानचे विश्वस्त आ़ बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, साई जन्मभूमी म्हणून शासनाकडे आराखडा दाखल झाला असून, त्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे़ एखाद्या मुद्यावरून वाद असेल तर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे़ मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही चर्चेसाठी बोलवावे़ त्यानंतरच निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले़ आ़ सुरेश वरपूडकर म्हणाले की, साईबाबा जन्मस्थळाच्या विकासासाठीच आम्ही निधी मागितला आहे़ मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली आहे़ शिर्डीकरांकडून विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जन्मभूमीचा वाद बाजुला ठेवू, असे सांगितले आहे; परंतु, आम्ही निर्णयावर ठाम आहोत़ त्यामुळे मराठवाड्यातील सर्व आमदार, खासदारांना सोबत घेवून मुख्यमंत्र्यांपुढे बाजू मांडू, असे ते म्हणाले़ आ़ डॉ़ राहुल पाटील यांनीही पाथरी हे श्री सार्इंचे जन्मस्थळ आहे व श्री सार्इंचे जन्मस्थळ हीच आमची अस्मिता आहे़ त्यामुळे आम्ही निर्णयावर ठाम आहोत़ यावेळी बोलताना खा़ बंडू जाधव म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील नेते मंडळी सातत्याने मराठवाड्याविषयी आकस बाळगतात़ जायकवाडीचे पाणी देण्यावरून विरोध होतो़ आता साई जन्मभूमीवरून विरोध केला जातो़ त्यांचा विरोध अत्यंत चुकीचा आहे़ तुमच्याकडे जन्मभूमीचे पुरावे असतील तर द्या, अन्यथा आमचे पुरावे स्वीकारा़ मुख्यमंत्री आमची भूमिका ऐकून घेतल्याशिवाय निर्णय घेणार नाहीत़ त्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर भूमिका मांडणार आहोत़ या संदर्भात पुरातत्व खात्याकडून माहिती घ्या़ शासन स्तरावर समिती नियुक्त करा, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली़ या बैठकीत पाथरीच श्री सार्इंची जन्मभूमी आहे, असा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला़