परभणी : ‘ब्लड आॅन कॉल’ने तीन हजार रुग्णांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:50 AM2018-06-04T00:50:27+5:302018-06-04T00:50:27+5:30
राज्य शासनाच्या जीवन अमृत योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असून २०१४ ते २०१८ या चार वर्षांत ३ हजार ६३३ रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे ‘ब्लड आॅन कॉल’ या सेवेने जिल्ह्यातील ३ हजार रुग्णांचे चार वर्षांमध्ये प्राण वाचविल्याची माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्य शासनाच्या जीवन अमृत योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असून २०१४ ते २०१८ या चार वर्षांत ३ हजार ६३३ रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे ‘ब्लड आॅन कॉल’ या सेवेने जिल्ह्यातील ३ हजार रुग्णांचे चार वर्षांमध्ये प्राण वाचविल्याची माहिती समोर आली आहे.
एखाद्या घटनेतील रुग्णांना तत्काळ रक्त मिळावे, रक्तावाचून रुग्णाचा मृत्यू होऊ नये या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालया व्यतिरिक्त जिल्ह्यातील ४० कि.मी. अंतरापर्यंत काही वेळातच रक्ताची पिशवी उपलब्ध व्हावी, यासाठी जानेवारी २०१४ पासून राज्य शासनाने ‘ब्लड आॅन कॉल’ योजनेची अंमलबजावणी सुरु केली. या योजनेअंतर्गत रुग्णाला रक्त पिशवीची आवश्यकता असल्यास त्या रुग्णाने किंवा नातेवाईकाने १०४ या टोल फ्री क्रमांकावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर संबंधित रुग्णालयात अर्ध्या तासात रक्त पिशवीचा पुरवठा केला जातो.
२०१४ पासून सुरु केलेल्या या योजनेला जिल्ह्यात दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०१४ या आर्थिक वर्षात ७४६ रुग्णांना ब्लड आॅन कॉल या योजनेतून रक्त पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात २९, फेब्रुवारी ६५, मार्च ८८, एप्रिल २०, मे ५४, जून १७, जुलै ७२, आॅगस्ट ७७, सप्टेंबर ६९, आॅक्टोबर १३५, नोव्हेंबर ८२ तर डिसेंबरमध्ये ३८ रुग्णांनी या योजनेअंतर्गत रक्त पिशवी मिळविली आहे.
२०१५ या वर्षात ७२३ रुग्णांना ब्लड आॅन कॉलच्या माध्यमातून रक्त पिशवीचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक १०४, त्या पाठोपाठ आॅक्टोबर महिन्यात ९४ तर सर्वात कमी जानेवारी महिन्यात ४५ रुग्णांनी सेवा घेतली आहे.
२०१६ या आर्थिक वर्षात तब्बल १ हजार २० रुग्णांनी १०४ या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन रक्त पिशवी मिळविली आहे. यामध्ये सर्वाधिक जानेवारी महिन्यात १४४, फेब्रुवारी १३५, जून १०० तर आॅगस्ट महिन्यात १०४ रक्त पिशवींचा पुरवठा करुन रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले आहेत.
२०१७ या आर्थिक वर्षात ७३२ तर १ जानेवारी २०१८ ते २१ मे २०१८ पर्यंत ४१२ रुग्ण व नातेवाईकांना जीवन अमृत सेवांतर्गत रक्त पिशवींचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक डिसेंबर महिन्यात ९९ तर आॅक्टोबर महिन्यात ८१ असे एकूण ३ हजार ६३३ रुग्णांचे प्राण जीवन अमृत सेवेच्या माध्यमातून वाचविण्यात यश मिळाले आहे.
फोन करा, रक्त पिशवी मिळवा
एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता असल्यास ब्लड आॅन कॉल या योजनेच्या १०४ टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास अर्ध्या तासात परभणी शहरापासून ४० कि.मी. अंतरापर्यंत केवळ ४० रुपयांचा सरचार्ज घेऊन रक्त पिशव्यांचा पुरवठा केला जातो. मागणी असलेल्या ठिकाणी रक्त पुरवठा करण्याची जबाबदारी परभणी जिल्ह्यासाठी अरुणोदय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला देण्यात आली आहे. या संस्थेचे तीन कर्मचारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा रक्तपेढीत कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्त पुरवठा केला जातो.