परभणी : पासवर्ड न दिल्याने केला होता खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:35 AM2018-11-29T00:35:19+5:302018-11-29T00:35:56+5:30
तालुक्यातील पिंप्री देशमुख येथे २० नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास जेसीबी चालकाने एटीएम कार्डाचा पासवर्ड न दिल्याने तिघांनी लाकडाने मारहाण करून त्याचा खून केल्याची माहिती उघड झाली असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे़ या आरोपींनी खुनाची कबुलीही दिली असून, या टोळीचा म्होरक्या असलेला तिसरा आरोपी मात्र फरार आहे़ २४ तासांच्या आत हे खून प्रकरण उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील पिंप्री देशमुख येथे २० नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास जेसीबी चालकाने एटीएम कार्डाचा पासवर्ड न दिल्याने तिघांनी लाकडाने मारहाण करून त्याचा खून केल्याची माहिती उघड झाली असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे़ या आरोपींनी खुनाची कबुलीही दिली असून, या टोळीचा म्होरक्या असलेला तिसरा आरोपी मात्र फरार आहे़ २४ तासांच्या आत हे खून प्रकरण उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे़
२० नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पिंप्री देशमुख शिवारात जेसीबी मशीनवर काम करणारे संतोष लिंबाजी सांगळे (आॅपरेटर) आणि उमेश केवला रावत हे दोघे जण जेसीबी मशीनवरच झोपले असताना रात्री तिघे जण त्या ठिकाणी आले़ आरोपींनी दोघांनाही मारहाण केली़ संतोष जवळील एटीएम कार्ड आणि ७०० रुपये काढून घेतले़ या मारहाणीत संतोष सांगळे याचा मृत्यू झाला होता़ या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता़ शेत शिवारामध्ये जेसीबी चालकाचा खून झाल्याने खळबळ उडाली होती़ या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, सुनील गोपीनवार, किशोर नाईक, सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, जमीर फारुखी, अरुण कांबळे, गणेश कौटकर, बाळासाहेब तुपसुंदरे, अनिल इंगोले, यशवंत वाघमारे, विशाल वाघमारे, संजय शेळके यांचे पथक तयार करण्यात आले़
या प्रकरणाचा तपास करीत असताना अजय उर्फ अजिंक्य जगताप (रा़ पुंगळा ता़ जिंतूर) आणि त्याचे इतर दोन साथीदार घटनेच्या दिवशी पिंप्री देशमुख येथे आल्याची माहिती स्थागुशाला मिळाली़ अजिंक्य हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याने या पूर्वी अनेक गुन्हे केले आहेत़ त्यामुळे पोलिसांनी अजिंक्यचा शोध घेतला़ त्याच्या हालचालींची माहिती घेतली़ तेव्हा अनेक बाबी उघड झाल्या़ हा खून अजिंक्य जगताप, रामेश्वर सुभाष देवनाळे (रा़ शिवरामनगर, परभणी) आणि वैभव नंदू मानवतकर (रा़ सोनाटी ता़ मेहकर जि़ बुलडाणा) या तिघांनी मिळून केल्याचे स्पष्ट झाले़ पोलिसांनी तातडीने पथके पाठवून रामेश्वर सुभाष देवनाळे यास उदगीर येथून आणि वैभव मानवतकर याला बुलडाणा जिल्ह्यातून ताब्यात घेतले़ दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे़