परभणी: बोनमॅरोसाठी २०० जणांचे रक्त नमुने घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:30 PM2019-03-25T23:30:53+5:302019-03-25T23:32:00+5:30
थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या बोनमॅरोट्रान्सप्लांट शिबिरात २०० जणांचे रक्त नमुने जमा करण्यात आले असून या रक्त नमुन्यांची चेन्नई येथील हिस्टोजेनिक या संस्थेमार्फत अमेरिकेतील प्रयोगशाळेत तपासणी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या बोनमॅरोट्रान्सप्लांट शिबिरात २०० जणांचे रक्त नमुने जमा करण्यात आले असून या रक्त नमुन्यांची चेन्नई येथील हिस्टोजेनिक या संस्थेमार्फत अमेरिकेतील प्रयोगशाळेत तपासणी होणार आहे.
थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुपच्या वतीने २४ मार्च रोजी परभणी शहरातील बी.रघुनाथ सभागृहात थॅलेसिमियाग्रस्तांसाठी बोनमॅरोट्रान्स्प्लांट तपासणी शिबीर घेण्यात आले. लायन्स क्लब आणि परभणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासाठी सहकार्य केले. मुंबई येथील दात्री फाऊंडेशनच्या वर्षा आणि नाशिक येथील ज्योती टंडन यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात जमा करण्यात आलेल्या रक्त नमुन्यांची अमेरिकेतील प्रयोगशाळेत तपासणी झाल्यानंतर प्राप्त झालेला रुग्णांना दिला जाणार आहे.
राज्यात प्रथमच परभणी येथे अशा स्वरुपाचे शिबीर पार पडले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी लायन्स क्लबचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मुद्गलकर, पत्रकार गणेश पांडे, रक्तविकारतज्ज्ञ डॉ.मनोज तोष्णीवाल, नाशिक येथील गिरीष भदरखे, जिंतूर येथील डॉ. बाहेती, सामान्य रुग्णालयातील कदम, ज्ञानेश्वर खटींग, मुश्ताक पठाण, मिलिंद लांबे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रिझवान काजी, डॉ.विशाल पवार, डॉ.समीर नवल, डॉ. राजगोपाल कालानी आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ.तोष्णीवाल व भदरखे यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या शंकाचे निरसण केले. तसेच या आजारावरील उपचारासंदर्भात आर्थिक मदत करणाऱ्या संस्थांची माहिती दिली. कार्यक्रमात थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुपच्या वतीने रुग्णांसाठी तयार केलेल्या पुस्तिकेचीही विमोचन करण्यात आले. लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुपच्या सदस्यांनी सहकार्य केले.