परभणी : बोगस प्रमाणपत्राची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:48 AM2019-05-11T00:48:02+5:302019-05-11T00:48:13+5:30
तालुक्यामध्ये विद्यार्थी व नागरिकांना लागणारे वेगवेगळे प्रशासकीय प्रमाणपत्रे दलालांमार्फत सहज उपलब्ध होत असल्याने बोगस प्रमाणपत्रांची धास्ती महसूल प्रशासनाने घेतली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): तालुक्यामध्ये विद्यार्थी व नागरिकांना लागणारे वेगवेगळे प्रशासकीय प्रमाणपत्रे दलालांमार्फत सहज उपलब्ध होत असल्याने बोगस प्रमाणपत्रांची धास्ती महसूल प्रशासनाने घेतली आहे़
विद्यार्थी व नागरिकांना उत्पन्न, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, शेतीचा उतारा, सातबारा यासह ४२ नमुन्यातील प्रमाणपत्र लागतात़ ही प्रमाणपत्रे काढताना अधिकृत महा-ई-सेवा केंद्रातून प्रमाणपत्र काढावीत़ इतर ठिकाणाहून घेतलेले प्रमाणपत्र बोगस असू शकतात़ त्यामुळे अशा प्रकारच्या प्रमाणपत्रांमुळे फौजदारी स्वरुपाची कार्यवाही होऊ शकते़ हे टाळण्यासाठी नागरिकांनी बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांची नावे व लेखी तक्रार महसूल प्रशासनाकडे करावी, असे आवाहन जिंतूरच्या तहसीलदारांनी केले आहे़ या संदर्भात चक्क फलक लावून बोगस प्रमाणपत्रापासून सावध करण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे़ या सर्व प्रकारामुळे महसूल प्रशासन बोगस प्रमाणपत्राला आळा घालू शकत नाही, असेच दिसून येत आहे़ याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
जिंतूर तालुक्यात बोगस प्रमाणपत्रे
४जिंतूर तालुक्यात विद्यार्थ्यांना, कर्ज घेण्यासाठी बँकेत जी प्रमाणपत्रे लागतात, दलालामार्फत ती काही मिनिटांत उपलब्ध करून दिली जातात़ या संदर्भात दोन महिन्यांपूर्वी महसूल विभागाने काही दलालांवर कारवाई केली होती.
यावेळी बोगस प्रमाणपत्र जप्त केली; परंतु, पुन्हा सर्व काही अलबेल झाले असल्याचे दिसून येत आहे़ पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची थातूर-मातूर चौकशी करून हे प्रकरण गुंडाळले़ परिणामी बोगस प्रमाणपत्र देणारे पुन्हा सक्रिय होवू लागले आहेत़ थातूरमातूर कारवाईमुळे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे़ विशेष म्हणजे तालुक्यात हजारो बोगस प्रमाणपत्रे आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे़