परभणी: कृषी विद्यापीठ गेटवर होणार उड्डाणपूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:27 PM2019-03-25T23:27:37+5:302019-03-25T23:27:57+5:30
शहरातील रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या विद्यापीठ गेटजवळ उड्डाणपूल बनविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासूनची वाहनधारकांची समस्या सुटण्याचा आशेचा किरण निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या विद्यापीठ गेटजवळ उड्डाणपूल बनविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासूनची वाहनधारकांची समस्या सुटण्याचा आशेचा किरण निर्माण झाला आहे.
परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून रेल्वेमार्ग गेला आहे. नांदेडकडे जाणाऱ्या या मार्गावर रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. परभणी रेल्वेस्थानकावर दररोज येणाऱ्या ४० आणि जाणाºया ४० अशा ८० रेल्वेगाड्यांचा प्रवास या मार्गावरुन होतो. शहराच्या ऐन मध्यवस्तीत रेल्वेमार्ग असल्याने रेल्वेवाहतुकीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात जाणाºया दोन मार्गावर रेल्वेगेट असून रेल्वेस्थानकाला लागूनच असलेले गेट विद्यापीठ गेट म्हणून ओळखले जाते. कृषी विद्यापीठ परिसरामध्ये दररोज हजारो नागरिक दाखल होतात. त्यामध्ये कृषी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी विद्यापीठात कंत्राटी तत्वावर काम करणारे शेतमजूर, कारागीर आणि या विद्यापीठात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच विद्यापीठ परिसरामध्ये नागपूर येथील पशू विज्ञान विद्यापीठाचे पशूवैद्यकीय महाविद्यालय असून या महाविद्यालयातील अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थ्यांनाही रेल्वेरुळ ओलांडून विद्यापीठ गाठावे लागते. याशिवाय विद्यापीठाच्या पलीकडील बाजुस असलेल्या चार ते पाच खेड्यांमधून शहरात येणाºया ग्रामस्थांनाही रेल्वेगेट ओलांडूनच यावे लागते.
रेल्वेगेट ओलांडून दररोज हजारो वाहनधारक प्रवास करतात. या वाहनधारकांना रेल्वेगेटवर अनेक वेळा ताटकळत उभे रहावे लागते. रेल्वे येण्याच्या जाण्याच्या वेळेमध्ये किमान १५ मिनिटे रेल्वेगेट बंद राहते. त्यामुळे २४ तासांमध्ये तब्बल १० तास हे रेल्वेगेट बंद राहते.
या रेल्वेगेटचा होणारा त्रास लक्षात घेऊन या ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षापासून केली जात होती. रेल्वे विभागाने या मागणीची दखल घेऊन नुकताच उड्डाणपुलाचा प्रस्ताव रेल्वेबोर्डाकडे पाठविला आहे. प्राथमिकस्तरावर उड्डाणपुलाचे डिझायनिंग तयार करुन रेल्वेच्या हद्दीत हा उड्डापूल उभारण्यासाठी किमान २५ कोटी रुपये लागतील, असा अंदाजही प्रस्तावात नमूद केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसली तरी येत्या काही दिवसांत उड्डाणपुलाची उभारणी होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
मातीच्या तपासणीला सुरुवात
४उड्डाणपूल उभारण्यासाठी सर्वप्रथम या भागातील मातीची तपासणी केली जाते. प्रस्तावित उड्डाणपूल परिसरात कोणत्या स्वरुपाची माती आहे, खडक किती फुटावर आहे आणि किती खोलीपर्यंत पुलाचे बांधकाम घ्यावे लागेल, याचा अंदाज या तपासणीवरुन बांधला जातो. आठवडाभरापासून या परिसरात बोअर मशीनच्या सहाय्याने ही तपासणी केली जात आहे. विद्यापीठ भागात दोन ठिकाणी आणि अक्षदा मंगल कार्यालयाच्या बाजुने चार ठिकाणी बोअर पाडून तपासणी सुरु असल्याचे दिसून आले.उड्डाणपूल उभारण्यापूर्वी मातीचा दर्जा तपासला जातो. त्यानंतरच प्रत्यक्ष पुलाचा आराखडा तयार करुन त्याचाही प्रस्ताव रेल्वे विभागाला सादर केला जातो. त्यामुळे ही तपासणी महत्त्वपूर्ण असल्याची माहिती मिळाली.