परभणी बसस्थानक :तात्पुरत्या शेडचा प्रस्ताव अधीक्षक अभियंत्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:17 AM2019-06-29T00:17:13+5:302019-06-29T00:17:21+5:30
येथील बसस्थानकाच्या जागेमध्ये बसपोर्ट उभारले जाणार असून, त्यासाठी बसस्थानकाची जुनी इमारत पाडावी लागणार असल्याने तात्पुरत्या स्वरुपात याच जागेत एक शेड उभारण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला असून, तो मंजुरीसाठी औरंगाबाद येथील महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविण्यात आला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील बसस्थानकाच्या जागेमध्ये बसपोर्ट उभारले जाणार असून, त्यासाठी बसस्थानकाची जुनी इमारत पाडावी लागणार असल्याने तात्पुरत्या स्वरुपात याच जागेत एक शेड उभारण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला असून, तो मंजुरीसाठी औरंगाबाद येथील महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविण्यात आला आहे़
परभणी शहरातील प्रवाशांच्या सुविधेसाठी अद्यावयत असे बसपोर्ट उभारण्यास शासनाने मंजुरी दिली आहे़ त्यासाठी १३ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे़ त्यामुळे बसपोर्ट उभारणीतील मुख्य अडथळा दूर झाला असून, एसटी महामंडळाने बसपोर्ट उभारणीसाठी निविदा प्रक्रिया राबविली़ विश्वशक्ती कन्स्ट्रक्शनला हे काम मिळाले आहे़ त्यामुळे लवकरच या ठिकाणी प्रत्यक्ष बसपोर्ट उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे़ बसस्थानक परिसरात बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचा साठा करण्यात आला आहे़ तसेच इतर तयारीही पूर्ण झाली आहे़ बसपोर्टची उभारणी जुन्या बसस्थानकाच्या जागेतच होणार असल्याने या ठिकाणी अस्तित्वात असलेली जुनी इमारत पाडावी लागणार आहे़ त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने बसस्थानकाच्या जागेतच बस थांबा उभारण्याचा प्रस्ताव महामंडळाने तयार केला आहे़ त्यासाठी बसस्थानकाच्या समोर रस्त्यालगत असलेल्या १० मीटर जागेत तात्पुरत्या स्वरुपात पत्र्याचे शेड उभारण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला आहे़ या ठिकाणी साधारणत: १६ प्लॉटफॉर्म प्रस्तावित केले असून, याच जागेत प्रवाशांना बस सेवेचा लाभ घेता येणार आहे़
दरम्यान, हा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविण्यात आला असून, प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे़ एसटी महामंडळाने नवीन बसपोर्ट उभारणीची तयारी सुरू केली आहे़ जुन्या बसस्थानकातील काही स्टॉल्स आणि इतर दुकाने बंद करण्याचे सूचित केले असून, बसस्थानकातील मुख्य कँटीनला सील लावले आहे़ तसेच इतर दुकानांनाही सील लावण्यात आले आहे़ त्यामुळे लवकरच बसस्थानकाची जुनी इमारत पाडून कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे़
तातडीने निर्णयाची गरज
४बसपोर्ट उभारणीच्या कामास साधारण: मार्च महिन्यामध्ये मंजुरी दिली होती़ त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागली़ त्यामुळे बसपोर्ट उभारणीचे काम थांबले होते़
४ सध्या पावसाळ्याचे दिवस असून, या काळात बांधकाम करताना अडथळे निर्माण होऊ शकतात़ त्यामुळे बसपोर्ट उभारणीचे काम तातडीने हाती घेणे गरजेचे आहे़ मात्र सध्या तरी न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे काम थांबले असल्याची माहिती एसटी महामंडळातून देण्यात आली़
न्यायालयाच्या स्थगितीमुळे थांबले काम
४परभणीतील बसस्थानकाची जुनी इमारत पाडण्याची कारवाई एसटी महामंडळाकडून केली जात असतानाच बसस्थानकातील काही स्टॉल्सधारकांनी इमारत पाडण्यास मंजुरी देऊ नये, अशा आशयाची याचिका न्यायालयात दाखल केली होती़
४या याचिकेवर सुनावणी झाली असून, न्यायालयाने इमारत पाडण्यास स्थगिती दिली आहे़ त्यामुळे इमारत पाडण्याचे मुख्य कामच थांबले आहे़ न्यायालयाच्या निर्णयानंतरच बसपोर्टच्या उभारणी संदर्भातील कामांना सुरुवात होणार आहे़