परभणी : पोटनिवडणुकीत दिग्गज उमेदवार विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:42 AM2018-03-01T00:42:45+5:302018-03-01T00:42:49+5:30
जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी झालेल्या पोट निवडणुकांचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून, विजयी उमेदवारांची गावा-गावांतून मिरवणूक काढीत जल्लोष साजरा केला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी झालेल्या पोट निवडणुकांचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून, विजयी उमेदवारांची गावा-गावांतून मिरवणूक काढीत जल्लोष साजरा केला़
गंगाखेड तालुक्यात चार ग्रामपंचायतीच्या चार जागांसाठी पोट निवडणूक झाली़ ९ ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी पोट निवडणूक जाहीर झाली़ त्यानंतर गौळवाडीतील ४, नरळद १, सेलमोहा १ अशा सहा जागा बिनविरोध आल्या़ तर पिंपळदरी, सुप्पा येथील रिक्त जागांसाठी अर्ज आले नाहीत़ त्यामुळे मैराळ सावंगी, सुप्पा ज़, खादगाव, धारासूर या चार ग्रामपंचायतमधील प्रत्येकी एका जागेसाठी पोट निवडणूक घेण्यात आली़
मैराळ सावंगी येथे राजेश्वर नरहरी पांचाळ यांनी २१५ मते घेत विजय संपादन केला़ सुप्पा येथे सावित्रा पांडूरंग बचाटे (२७८), धारासूर येथे मंगलबाई उत्तमराव गवडे (३३५), खादगाव येथे गोपाळ गम्पू गुट्टे (२५७) हे उमेदवार विजयी झाले़ तहसीलदार जीवराज डापकर, नायब तहसीलदार विजय दावणगावकर यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली़ मतमोजणीसाठी एस़पी़ डाके, दत्तराव बिलापट्टे, किरण साखरे यांनी सहकार्य केले़ निवडणूक निर्णय अधिकारी बी़ आऱ उकंडे, पी़टी़ राठोड यांनी निकाल जाहीर केला़
जिंतूरमध्ये राकाँचे वर्चस्व
पोट निवडणुकांमध्ये आ़ विजय भांबळे यांच्या गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे़ जिंतूर तालुक्यात १७ जागांसाठी निवडणूक लागली होती़ पाच जागांवर उमेदवारी अर्ज न आल्याने त्या रिक्त राहिल्या़ उर्वरित बारा जागांपैकी ५ जागा बिनविरोध आल्या़
त्यात संगळेवाडी, साखरतळा, मानमोडी, नांगणगाव येथील प्रत्येकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले़ उर्वरित सात जागांसाठी निवडणूक झाली़ त्यात मारवाडी येथील चार पैकी ३, बोरी १, चारठाणा १, घागरा १ अशा सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या आहेत़ सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा आ़ विजय भांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़
चारठाण्यात मीरा निकाळजे विजयी
४चारठाणा- येथील प्रभाग १ च्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीना नानासाहेब निकाळजे या २१४ मतांनी विजयी झाल्या आहेत़ निकाळजे यांना ३७७ मते मिळाली असून, त्यांच्या प्रतीस्पर्धी उमेदवार अरुणा दयानंद निकाळजे यांना १६३ मते मिळाली़ मीरा निकाळजे यांच्या विजयानंतर जल्लोष करण्यात आला़ यावेळी नानासाहेब राऊत, सरपंच बी़जी़ चव्हाण, मधुकर भवाळे, उपसरपंच जलील इनामदार, दशरथ चव्हाण, नानासाहेब निकाळजे, प्रसादराव भांबळे, वाजेद कुरेशी आदींची उपस्थिती होती़
परभणी तालुक्यातील निकाल घोषित
तालुक्यातील ताडपांगरी येथील एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत कालिंदाबाई मंचकराव वैरागर या विजयी झाल्या आहेत़ त्यांना १२६ मते मिळाली तर त्यांचे प्रतीस्पर्धी उमेदवार कलावती कांबळे यांना ८४ मते मिळाली आहेत़ करडगाव ग्रामपंचायतीत नारायण मदनराव खिस्ते १९४ मते घेऊन विजयी झाले़ त्यांचे प्रतीस्पर्धी दत्ता मुंडे यांना ६३ मते मिळाली़ दैठणा येथील एका जागेच्या पोट निवडणुकीत आबाराव बालासाहेब कच्छवे हे २७१ मते घेऊन विजयी झाले़ त्यांचे प्रतीस्पर्धी भागवत मुंजाजी कच्छवे यांना १३५ मते मिळाली़ या पोट निवडणुकीसाठी पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ परभणी तालुक्यातील जोड परळी येथे प्रसाद काळे, टाकळगव्हाण ग्रामपंचायतीत सुरेखा दीपक पितांबरे, कुंभारी ग्रामपंचायतीत रेखा पांडूरंग जुंबडे, बलसा खुर्द ग्रा़पं़ दोन जागांसाठी जिजाराव विठ्ठलराव शिंदे आणि गंगासागर उत्तम शिंदे असे दोनच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी जाहीर केले़
बोरीत गणेश चौधरी विजयी
बोरी-बोरी ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश चौधरी ४९१ मते घेऊन विजयी झाले आहेत़ विजयी उमेदवाराची गावातून मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी जि़प़ गटनेते अजय चौधरी, माजी सभापती अशोकराव चौधरी, पं़स़ सदस्य सुभाष घोलप, सरपंच सखाराम शिंपले, शशिकांत चौधरी, विजयकुमार चौधरी, रामकिशन निवळकर, सतीश चौधरी आदींची उपस्थिती होती़
राकाँचे पुन्हा वर्चस्व
ताडकळस येथील प्रभाग ३ मधील पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जागा कायम ठेवत वर्चस्व प्रस्थापित केले़ प्रभाग ३ मधील ग्रा़पं़ सदस्य इंदूबाई गणेशराव अंबोरे या जि़प़ सदस्य म्हणून निवडून आल्याने ही जागा रिक्त झाली होती़ २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या पोट निवडणुकीत तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ बुधवारी निकाल जाहीर झाला़ त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुशीलाबाई जनार्धन अंबोरे या ४२८ मते घेऊन विजयी झाल्या़