परभणी :अमृत अभियान योजनेचे कार्यारंभ आदेश रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:25 AM2018-02-01T00:25:23+5:302018-02-01T00:25:27+5:30
अमृत अभियानांतर्गत परभणी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मंजूर झालेल्या योजनेच्या कामाच्या सुधारित मान्यतेस स्थायी समितीची मंजुरी घेतली नसल्याने या योजनेचे कंत्राटदाराला दिलेले कार्यारंभ आदेश रद्द करावेत, या मागणीसाठी मनपातील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बुधवारी मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची भेट घेतली व या संदर्भात संताप व्यक्त केला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अमृत अभियानांतर्गत परभणी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मंजूर झालेल्या योजनेच्या कामाच्या सुधारित मान्यतेस स्थायी समितीची मंजुरी घेतली नसल्याने या योजनेचे कंत्राटदाराला दिलेले कार्यारंभ आदेश रद्द करावेत, या मागणीसाठी मनपातील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बुधवारी मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची भेट घेतली व या संदर्भात संताप व्यक्त केला़
परभणी शहरासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली़ या योजनेच्या कामासाठी मागविण्यात आलेल्या निविदांमध्ये औरंगाबाद येथील विजय कन्स्ट्रक्शन व नांदेड येथील संतोष इन्फ्रा प्रा़ लि़ या दोन निविदाधारकांनी निविदा सादर केल्या होत्या़ त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या परभणी व नांदेड कार्यालयाने त्यांची तपासणी करून अंतीम मान्यतेसाठीचा प्रस्ताव मुंबई येथील सदस्य सचिवांकडे पाठविला होता़ त्यानुसार १८ जुलै २०१७ रोजी निविदेतील विजय कन्स्ट्रक्शन यांनी ९़९९ टक्के जास्त दराने निविदा भरली होती़ या प्रकरणी २८ आॅगस्ट २०१७ रोजी दर तडजोड करून स्थायी समितीपुढे प्रस्ताव ठेवण्यात आला़ त्यामध्ये ९़५० टक्के अंदाजपत्रकीय रक्कम जास्त दराने विजय कन्स्ट्रक्शनची निविदा स्वीकारण्याचा ठराव घेण्यात आला़ या कामाच्या निविदा स्वीकृतीस राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळविण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला़ त्यानुसार राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या २७ आॅक्टोबर २०१७ रोजी झालेल्या बैठकीत या योजनेच्या कामाच्या निविदेच्या किंमतीच्या ७़९९ टक्के अधिक दर असे कमी करून मनपा स्थायी समितीने या पाणीपुरवठा योजनेच्या निविदा स्वीकृतीच्या ठरावामध्ये सुधारणा करून मान्यता देण्यात यावी, असे नमूद करण्यात आले. १० नोव्हेंबर २०१७ रोजी नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी निलेश पोतदार यांच्या स्वाक्षरीनिशी याबाबत मनपाला याबाबतचे पत्र मिळाले़ अशा प्रकारची पूर्व कल्पना स्थायी समितीला न देता सरळ या कामाचे कार्यारंभ आदेश २७ नोव्हेंबर २०१७ रोजी देण्यात आले़ त्यामुळे १० नोव्हेंबर २०१७ रोजी कक्ष अधिकाºयांनी पाठविलेल्या पत्रानुसार स्थायी समितीच्या ठरावात सुधारणा न करताच दिलेले कार्यारंभ आदेश रद्द करावेत, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते विजय जामकर, शिवसेनेचे गटनेते चंदू शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते जलालोद्दीन काजी, नगरसेवक इम्रान हुसैनी, भाजपाच्या गटनेत्या मंगला मुदगलकर यांच्यासह विरोधी सदस्यांनी बुधवारी सायंकाळी मनपा आयुक्त रेखावार यांची भेट घेतली व कार्यारंभ आदेश रद्द करण्याची मागणी केली़
स्थायी समितीला डावलून कसा काय निर्णय घेतला ? असा सवाल केला़ त्यावर रेखावार यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार निर्णय घेतल्याचे सांगितले़ वरिष्ठांनी लेखी स्वरुपात सूचना दिल्या होत्या का? असा प्रतिप्रश्न विरोधी सदस्यांनी केला़ त्यावर रेखावर यांनी लेखी आदेश नसल्याचे सांगितले़ यावरुन बैठकीत बरीच चर्चा झाल्याचे समजते़ शेवटी या संदर्भात रेखावार यांनी लेखी उत्तर विरोधी पक्षातील सदस्यांना द्यावे, अशी मागणी करण्यात आली़ त्याला रेखावार यांनी होकार दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले़